बोरगाव मंजू : परिस्थितीवर मात करीत सिरसाट भगिनींची भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:58 AM2018-01-20T00:58:02+5:302018-01-20T00:59:16+5:30
अकोला : हलाखीची परिस्थिती असूनही जिद्द आणि चिकाटीच्या बळावर बोरगाव मंजू येथील करुणा आणि भावना या भगिनींनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए.च्या गुणवत्ता यादीत अनुक्रमे पहिला आणि तिसरा क्रमांक पटकावला.
संदीप वानखडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : हलाखीची परिस्थिती असूनही जिद्द आणि चिकाटीच्या बळावर बोरगाव मंजू येथील करुणा आणि भावना या भगिनींनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए.च्या गुणवत्ता यादीत अनुक्रमे पहिला आणि तिसरा क्रमांक पटकावला.
अठराविश्वे दारिद्रय़ असल्याने घरात शिक्षणाचे कोणतेच वातावरण नसताना सिरसाट भगिनींनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. सिरसाट कुटुंबाच्या बोरगाव मंजू येथील सिद्धार्थ नगरात एका छोट्या घरात करुणा आणि भावना राहतात. त्यांचे वडील बंडू सिरसाट हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकतात. आई ज्योती सिरसाट यांचे पाचवीपर्यंत आणि वडिलांचे दहावीपर्यंत शिक्षण झालेले. आपले शिक्षण कमी झालेले असले, तरी आपल्या मुलींचे शिक्षण कमी होऊ नये, यासाठी दोघेही धडपड करीत आहेत. मोलमजुरी करून आपल्या मुलींसह मुलाचे शिक्षण सिरसाट दाम्पत्य करीत आहेत. आई-वडिलांच्या परिश्रमाची जाण असलेल्या भावना आणि करुणा यांनीही चांगली मेहनत घेऊन यश मिळवत आहेत. संत गजानन महाराज महाविद्यालयात त्यांनी बी.ए. पूर्ण केले. बी.ए. अंतिम वर्षांची परीक्षा त्यांनी २0१७ मध्ये दिली होती. यामध्ये करुणा हिने तिन्ही वर्षांच्या एकूण १५00 गुणांपैकी १२३८ गुण घेत ८२.५३ टक्के गुण मिळवले, तर भावना हिने तिन्ही वर्षांच्या एकूण १५00 गुणांपैकी १२१७ गुण घेत ८१ टक्के गुण मिळवले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे.
यात करुणा ही विद्यापीठातून प्रथम, तर भावना ही विद्यापीठातून तिसरी आली आहे. कुठल्याही सुख-सुविधा नसताना, हातमजुरी करतानाच मेहनत आणि परिश्रमाच्या बळावर दोन्ही बहिणींनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. परिस्थिती गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या आड येत नसल्याचे या दोन्ही भगिनींनी सिद्ध केले आहे. या भगिनींना आई-वडिलानी परिस्थिती नसतानाही पाठबळ दिल्याने त्या हे यश मिळवू शकल्या.
या भगिनींना संस्थाध्यक्ष गजानन दाळू गुरुजी, सचिव ओमप्रकाश दाळू, सहसचिव दिवाकर गावंडे, प्राचार्य डॉ. पूजा सपकाळ, डॉ. राठोड आणि महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे मार्गदर्शन लाभले.
बारावीतही बोर्डातून प्रथम व द्वितीय
करुणा आणि भावना यांनी आपल्या कर्तृत्वाची चुणूक बारावीपासून दाखवली. इयत्ता बारावीमध्ये अमरावती बोर्डातून कला शाखेत दोन्ही भगिनींनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच महाराष्टातून त्या दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर होत्या.