बोरगाव मंजू पळसो ते मुर्तीजापुर मार्ग बंद; काटेपूर्णा नदीला गोरेगावनजीक नदीत प्रचंड पूर
By सचिन राऊत | Published: July 22, 2023 06:32 PM2023-07-22T18:32:29+5:302023-07-22T18:33:22+5:30
गोरेगाव गाजीपुर या दोन गावांच्या मध्ये असलेल्या काटेपूर्णा नदीला शनिवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पूर आला.
अकोला: अकोल्यावरून सांगळुद, धोतरडी, दहिगाव, पळसो मार्गे मुर्तीजापुरकडे जाणारा रस्ता व बोरगाव मंजू पळसो मार्गी मुर्तीजापुरकडे जाणारा रस्त्यावरील गोरेगाव नजीक असलेल्या काटेपूर्णा नदीला प्रचंड पूर आल्याने हा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल ३० ते ४० गावातील वाहतूक थांबली असून विद्यार्थी व प्रवासी वाहने आहे त्या खेड्यातच थांबविण्यात आली आहेत. गोरेगाव गाजीपुर या दोन गावांच्या मध्ये असलेल्या काटेपूर्णा नदीला शनिवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पूर आला.
त्यामुळे मुर्तीजापुर येथे असलेले या भागातील शाळेतील मुले व प्रवासी वाहने आहे त्या ठिकाणीच थांबविण्यात आली. काटेपूर्णा नदीला मोठ्या प्रमाणात पूर असल्याने पळसो बढे, कौलखेड जहागीर, खडका, दहिगाव गावंडे, गोरेगाव, गाजीपुर, सांगळुद, धोतरडी, चिखली कादवी, खराब ढोरे या परिसरातील वाहतुकीवर मोठा खोळंबा झाला होता. काटेपूर्णा नदीला आलेला पूर सायंकाळच्या सुमारास कमी झाल्यानंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली. महान धरणाच्या सांडव्यातून असलेल्या या नदीला रात्रभऱ्यापासून सुरू असलेल्या पाण्यामुळे मोठा पूर आला होता. त्यामुळेच या भागातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता.