बोगस जात प्रमाणपत्राचा गोरखधंदा चव्हाट्यावर!
By admin | Published: June 10, 2016 02:19 AM2016-06-10T02:19:27+5:302016-06-10T02:19:27+5:30
बनावट बारकोड, एसडीओची स्वाक्षरी व शिक्क्याचा वापर.
अकोला: बनावट उपविभागीय अधिकार्याची (एसडीओ) स्वाक्षरी, शिक्का, बार कोड आणि एमआरसी क्रमांकाचा वापर करून बोगस जात प्रमाणपत्र देण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची धक्कादायक बाब ७ जून रोजी चव्हाट्यावर आली. अकोल्यातील गोपाल बाबूलाल चाकर यांचा मुलगा नीळकंठ चाकर इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. पुढील उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी लागणार्या नॉनक्रिमिलीयर प्रमाणपत्राकरिता नीळकंठ गोपाल चाकर याचा प्रस्ताव सेतु केंद्रामार्फत अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार नॉनक्रिमिलीयर प्रमाणपत्रावर उपविभागीय अधिकार्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी गत ७ जून रोजी नीळकंठचे वडील गोपाल चाकर आणि सामाजिक कार्यकर्ते पंकज जायले अकोल्याच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात गेले होते. त्यावेळी उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी त्यांच्या प्रस्तावाची पडताळणी केली असता, प्रस्तावासोबत जोडण्यात आलेले नीळकंठ चाकरच्या जात प्रमाणपत्रावरील बार कोड, एमआरसी क्रमांक तसेच उपविभागीय अधिकार्याची स्वाक्षरी आणि शिक्का बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे नीळकंठ चाकर याचे धोबी जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे उपविभागीय अधिकार्यांनी चाकर यांना सांगितले. या प्रकाराने अकोल्यात बनावट बार कोड, उपविभागीय अधिकार्याची स्वाक्षरी आणि शिक्क्याचा वापर करून, चार ते पाच हजार रुपयांमध्ये बोगस जात प्रमाणपत्र देण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची बाब समोर आली.