कोट्ट्यवधींच्या कर्जाचे आमिष देऊन आर्थिक गंडा घालणारे गुजरातमधील दोघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:57 PM2018-10-01T12:57:10+5:302018-10-01T12:58:51+5:30
अकोला : गुजरातमधील वडोदरा येथील शिवधारा चंदन फीनसर्व प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालक व एजंटांनी अकोल्यातील गीता नगरमधील एका व्यापाऱ्यास कोट्ट्यवधी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष देऊन त्यांची पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे
अकोला : गुजरातमधील वडोदरा येथील शिवधारा चंदन फीनसर्व प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालक व एजंटांनी अकोल्यातील गीता नगरमधील एका व्यापाऱ्यास कोट्ट्यवधी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष देऊन त्यांची पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना जुने शहर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गीता नगरातील रहिवासी विजय आनंदराय मेहता यांना पैशाची गरज असल्याने त्यांनी शहरातील काही बँकांमध्ये कर्ज घेण्यासाठी प्रयत्न केले; मात्र त्यांना कर्ज मिळाले नाही. अशातच त्यांना भ्रमणध्वनीवर कोट्ट्यवधी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष देण्यात आले. त्यांनी सखोल माहिती घेतली असता गुजरातमधील वडोदरा येथील शिवधारा चंदन फीनसर्व प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कोट्ट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप करीत असल्याचे समोर आले; मात्र त्यासाठी सुरुवातीला काही रक्कम खातेदाराला त्यांच्या कंपनीकडे जमा करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले. यावर विश्वास ठेवत विजय मेहता यांनी या कंपनीचा अकोल्यातील एजंट दिलीप वीरेंद्र चौरसीया याच्यामार्फत २ लाख ५० हजार रुपये सदर कंपनीमध्ये जमा केले. त्यानंतर पुन्हा २ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कमही सदर कंपनीच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. पाच लाख रुपयांची रक्कम कंपनीच्या खात्यात जमा केल्यानंतर त्यांना एक कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगण्यात आले; मात्र प्रत्यक्षात कर्जाची रक्कम देण्यात आली नाही. कंपनीने त्यांची टाळाटाळ सुरू करताच फसवणूक झाल्याचे मेहता यांच्या लक्षात आले. त्यांनी सदर प्रकरणाची तक्रार केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून सदर कंपनीच्या संचालकासह एजंटविरुद्ध २४ जुलै २०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये कुणाल प्रेमकिशोर चौरसीया, दिलीप वीरेंद्र चौरसीया, जसूभाई नारायणभाई परमार ऊर्फ वनकर ३५ उत्सव कॉलनी गोध्रा गुजरात, जयेश कुमार बाबूभाई पटेल ४२ बडोदा गुजरात यांचा समावेश आहे. यामधील जसूभाई नारायणभाई परमार, जयेश कुमार बाबूभाई पटेल या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अन्वर शेख यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोटभरे, अनिस पठाण, सुभाष राठोड, धनराज ठाकूर, महिला कर्मचारी शैला खंडारे यांनी केली.