अपहृत दोन्ही चिमुकले पोलिसांच्या ताब्यात!
By admin | Published: September 15, 2016 03:04 AM2016-09-15T03:04:58+5:302016-09-15T03:04:58+5:30
विजयवाडा व बासरहून पोलीस पथक आज हिवरखेडला पोहोचणार.
हिवरखेड (जि. अकोला), दि. १४- शहरातील गोर्धावेस परिसरात राहणार्या विजय पवार (७) व वैभव भागडकर (८) या दोन्ही चिमुकल्यांचे शनिवार, १0 सप्टेंबर रोजी अज्ञात इसमाने अपहरण केले होते. यापैकी एक मुलगा तेलंगणातील बासरला तर दुसरा आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे सापडला.हिवरखेडच्या ठाणेदारांनी पाठविलेल्या पोलीस पथकाने १४ सप्टेंबर रोजी या दोन्ही मुलांना ताब्यात घेतले असून हे पथक १५ सप्टेंबरला हिवरखेडला पोहोचणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर दोन मुलांपैकी वैभव भागडकर हा बासर रेल्वेस्टेशन (तेलंगणा) येथे रेल्वे पोलिसांना सापडला तर विजय पवार हा सात वर्षीय चिमुकला आंध्र प्रदेशातील विजयवाडा या शहरातील रेल्वेस्टेशनवर तेथील पोलिसांना मिळाला. विजयवाडा येथील चाइल्ड लाइन कोऑर्डिनरचे जेकब तसेच बासर रेल्वे पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मनोहर यांनी या चिमुकल्या मुलांचे फोटो व माहिती व्हाट्सअँपवर पाहून अकोला पोलीस, हिवरखेडचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्याशी संपर्क साधून चिमुकले हिवरखेड येथील असल्याची खात्री केली.त्यांच्याकडून मुले सापडल्याची माहिती मिळाल्याचे कळल्याने हिवरखेड पोलीस स्टेशनचे पथकातील राजेश भगत, श्रीकृष्ण गायकवाड व अमोल पवार हे मुलाचे पालक गजानन भागडकर व सुनील पवार यांच्यासमवेत बासर व विजयवाडा येथे गेले.तेथे त्यांनी १४ सप्टेंबरच्या संध्याकाळी ६ वाजता विजय पवार (७) व वैभव भागडकर (८) या चिमुकल्यांना ताब्यात घेतल्याची माहिती ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांनी दिली.