दोन्ही बिबट्यांचा मृत्यू शॉक लागून झाल्याचे निष्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 11:33 AM2021-01-02T11:33:59+5:302021-01-02T11:39:19+5:30
Leopard News पिंपळखुटा परिसरात दोन बिबट्यांचा मृत्यू शॉक लागूनच झाल्याचे उत्तरीय तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे.
खेट्री : पातूर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत पिंपळखुटा परिसरात दोन बिबट्यांचा मृत्यू शॉक लागूनच झाल्याचे उत्तरीय तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. दोन्ही बिबट्यांच्या मृत्यूमध्ये काही तासांचे अंतर असल्याचेही समोर आले आहे.
पिंपळखुटा परिसरात लोखंडी विद्युत खांबाचा शॉक लागून दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आली होती. विद्युत खांबाच्या जवळ मृतावस्थेत मुंगूसही आढळल्याने मुंगसाची शिकार करण्यासाठी बिबटे शेतात घुसल्याचा अंदाज गावकऱ्यांनी वर्तविला होता., परंतु त्यावेळी एक बिबटा फुगलेल्या अवस्थेत आढळून आल्याने दोन्ही बिबट्यांचा मृत्यू संशयास्पद झाल्याचे समोर आले होते. आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे यांनी पंचनामा करून दोन्ही बिबट्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले होते. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे करीत आहेत.
दोन्ही बिबट्यांचा मृत्यू संशयास्पदच
ज्या ठिकाणी लोखंडी विद्युत खांबाचा शॉक लागून बिबट्यांचा मृत्यू झाला, त्या खांबामध्ये विद्युत प्रवाह नव्हता असे महावितरण विभागानी जाहीर केले, तसेच बिबट्यांच्या मृत्यूमध्ये काही तासाचा अंतर आहे. त्यामुळे बिबट्यांचा मृत्यू त्या विद्युत खांबाला शॉक लागून झाला किंवा, कुणी शिकार करण्याच्या हेतूने मारून त्या ठिकाणी आणून टाकले, हे तपासानंतरच स्पष्ट होईल.
दोन्ही बिबट्यांचा उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाला असून, त्या अहवालानुसार दोन्ही बिबट्यांचा मृत्यू शॉक लागूनच झाला आहे. तसेच दोन्ही बिबट्यांच्या मृत्यूमध्ये काही तासांचा अंतर आहे. चौकशी सुरू आहे.
सतीश नालिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, आलेगाव