ट्रकच्या चाकाखाली आल्याने युवकाचे दोन्ही हात निकामी, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 05:03 PM2022-10-05T17:03:49+5:302022-10-05T17:04:51+5:30
मूर्तिजापूर - राष्ट्रीय महामार्गावरील नागठणा गावाजवळ ट्रकने (ट्रेलर) धडक दिल्याने २५ वर्षीय युवक गंभीर जखमी होऊन त्याच्या दोन्ही हाताचा ...
मूर्तिजापूर - राष्ट्रीय महामार्गावरील नागठणा गावाजवळ ट्रकने (ट्रेलर) धडक दिल्याने २५ वर्षीय युवक गंभीर जखमी होऊन त्याच्या दोन्ही हाताचा चेंदामेंदा झाल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास घडली.
सोयाबीन सोंगणीचा हंगाम असल्याने मध्यप्रदेशातील दुर्मिळ भागातून शेकडो मजूर या कामासाठी विदर्भात दाखल होतात, याच पृष्ठभूमिवर मूर्तिजापूर तालुक्यातील हेंडज येथे मध्यप्रदेशातील खेरवाडा ता. आडनेर जि. बैतूल येथील मजूर काम करणासाठी आला आहे.
विजय सुलाभ कुमरे (२५) हा पहाटे शौचाला जातो म्हणून मुक्कामाच्या ठिकाणावरुन चालत राष्ट्रीय महामार्गाने नागठणा गावाजवळ पोहोचला असता अमरावतीकडून येणाऱ्या भरधाव (ट्रेलर) ट्रक क्रमांक आर जे ०७ जीसी ४२३९ ने धडक दिली त्यामुळे विजय कुमरे हा समोरच्या चाखाली आला, तो किमान २५ फुट चाका सोबत घासत (फरफटत) गेल्याने त्याच्या दोन्ही हाताचा चेंदामेंदा होऊन पुर्ण निकामी झाले.
पाठीला व पायांना गंभीर दुखापत झाली आहे, जखमी विजय याला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात रतनलाल शाहू कुमरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ग्रामीण पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सत्यजित मानकर, हेड कॉन्स्टेबल विजय मानकर करीत आहे.