जिल्हयात प्रतिबंधात्मक ५४ गावांच्या सीमा बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:17 AM2021-05-17T04:17:22+5:302021-05-17T04:17:22+5:30
अकोला: जिल्हयातील कोरोना विषाणूचा वाढता कहर रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले कडक निर्बंध १ जूनपर्यत वाढविण्यात आले असून, त्यामध्ये प्रतिबंधात्मक ...
अकोला: जिल्हयातील कोरोना विषाणूचा वाढता कहर रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले कडक निर्बंध १ जूनपर्यत वाढविण्यात आले असून, त्यामध्ये प्रतिबंधात्मक गावे म्हणून घोषित करण्यात आलेल्या जिल्हयातील ५४ गावांच्या सीमा बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी दिला. या आदेशाची अंमलबजावणी करीत, रविवारी जिल्हयातील प्रतिबंधात्मक ५४ गावांच्या सीमा बंद करण्याची कार्यवाही स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात आली.
जिल्हयातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्हयात ९ ते १५ मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. परंतू कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, १५ मे रोजी रात्री १२ वाजतापासून १ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत जिल्हयात कडक निर्बंध वाढविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १५ मे रोजी दिला. त्यामध्ये ग्रामीण भागात दहापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, यासाठी जिल्हयातील ५४ गावे प्रतिबंधात्मक गावे म्हणून घोषित करण्यात आली. या गावांच्या सीमा बंद करुन कडक निर्बंधांची अंमलबजावणी व व्यवहार बंद ठेवण्याची कार्यवाही करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हयातील उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुषंगाने जिल्हयातील प्रतिबंधात्मक ५४ गावांच्या सीमा स्थानिक प्रशासनामार्फत १६ मे रोजी बंद करण्यात आल्या असून, संबंधित गावांमध्ये कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
सीमा बंद करण्यात आलेली तालुकानिहाय अशी आहेत गावे!
अकोला तालुका : सांगवी, म्हैसपूर, डोंगरगाव, उगवा, सुकोडा, वणी रंभापूर, बोरगावमंजू, बोरगाव खुर्द, सोनाळा, हिंगणी बु., रोहणा, सांगळूद बु., कोठारी, येळवण.
अकोट तालुका: सुकळी, लोहारी, अटकळी, अकोलखेड, रुइखेड, बोर्डी, चोहोट्टा, अकोली जहाॅगीर, दिवठाणा, नांदखेड.
बाळापूर तालुका: मनारखेड, मोरगाव सादीजन, पळशी खुर्द, हिंगणा, व्याळा, वाडेगाव, पारस, मानकी.
बार्शिटाकळी तालुका: कातखेड, भेंडी महाल, खापली, टेंभी, महान, खेर्डा खुर्द.
मूर्तिजापूर तालुका: सिरसो, मदापूरी, राजुरा सरोदे, दहातोंडा.
पातूर तालुका: आसोला, सुकळी, अंबाशी, सस्ती, विवरा, चोंढी,सायवणी.
तेल्हारा तालुका: निंभोरा, बेलखेड, सौंदळा, हिवरखेड, वडगाव रोठे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ५४ गावे प्रतिबंधात्मक गावे म्हणून घोषित करण्यात आली असून, या गावांच्या सीमा स्थानिक प्रशासनामार्फत रविवारी बंद करण्यात आल्या. तसेच संबंधित गावांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी.