खेलो इंडिया युथ गेम्समध्ये अकोल्याच्या दोन बॉक्सरांचे सुयश
By रवी दामोदर | Published: January 31, 2024 07:02 PM2024-01-31T19:02:58+5:302024-01-31T19:03:24+5:30
खेलो इंडिया युथ स्पर्धेत बॉक्सिंग गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व अकोला क्रीडा प्रबोधनीचे शाश्वत तिवारी व गौरव चव्हाण या बॉक्सरांनी केले.
अकोला : चैन्नई येथे खेलो इंडिया युथ स्पर्धा रंगली असून, देशभरातील स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेमध्ये बॉक्सिंग गटात अकोला क्रीडा प्रबोधनीच्या बॉक्सरांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून रजत व कांस्य पदकावर नाव कोरले आहे. स्पर्धकांनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व केले.
खेलो इंडिया युथ स्पर्धेत बॉक्सिंग गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व अकोला क्रीडा प्रबोधनीचे शाश्वत तिवारी व गौरव चव्हाण या बॉक्सरांनी केले. स्पर्धेदरम्यान चमकदार कामगिरी करीत ५६ किलो वजनगटात शाश्वत तिवारी ह्याने कांस्य पदक व ६३ किलो वजन गटात गौरव चव्हाण याने रजत पदक प्राप्त केले आहे. स्पर्धेत गौरव चव्हाण हा देशातील दुसऱ्या, तर शाश्वत तिवारी हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा बॉक्सरपटू ठरला आहे. विजयी बॉक्सरांना अकोला क्रीडा अधिकारी तथा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सतीशचंद्र भट यांच्याकडे प्रशिक्षण घेतले आहे.
अकोला क्रीडा प्रबोधनीचे पाच खेळाडू महाराष्ट्र संघात
खेलो इंडिया युथ स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधनीच्या पाच बॉक्सरांनी सहभाग घेतला होता. त्या खेळाडूंनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनीधित्व केले. त्यामध्ये तन्मय कलंत्रे, रेहान शाह, शाश्वत तिवारी, गौरव चव्हाण यांच्या समावेश आहे. दरम्यान, संघासोबत गजानन कबीर, विजय यांनी काम पाहिले.