मुलगा सापडला...पण आई-वडिलांकडे सोपवायला लागले दोन महिने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 10:29 AM2020-07-08T10:29:36+5:302020-07-08T10:31:24+5:30

अखेर मंगळवारी दुपारी प्रतीक्षा संपली अन् हा चिमुरडा आईच्या कुशीत शिरला, तेव्हा आईकडे बोलायला शब्दच नव्हते.

The boy was found ... but it took two months to hand him over to his parents! | मुलगा सापडला...पण आई-वडिलांकडे सोपवायला लागले दोन महिने!

मुलगा सापडला...पण आई-वडिलांकडे सोपवायला लागले दोन महिने!

googlenewsNext
ठळक मुद्देपहाटेच्या सुमारास रेखा यांना जाग आल्यावर मुलगा दिसला नाही. मुलाला कोणीतरी पळवून नेल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी रेल्वे पोलीस स्थानक गाठले.हा मुलगा १६ मे रोजी सापडल्यानंतर त्याची ओळख पटविण्यात आली.

अकोला : अकोल्याच्या रेल्वेस्थानकावरून १८ फेब्रुवारी २०२० रोजी अपहरण झालेला दीड वर्षाचा मुलगा १६ मे रोजी नागपुरात सापडला. त्याची ओळखही पटली; परंतु तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीत कागदी घोड्यांनी या मुलाची अन् त्याच्या आई- वडिलाची भेट अडवून ठेवली होती. अखेर मंगळवारी दुपारी प्रतीक्षा संपली अन् हा चिमुरडा आईच्या कुशीत शिरला, तेव्हा आईकडे बोलायला शब्दच नव्हते.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील बाभळी या गावातील विजय व रेखा पवार हे दाम्पत्य लोहारकाम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुली, एक मुलगा असे अपत्य. हे दाम्पत्य दीड वर्षाच्या सुमित नावाच्या मुलासह १८ फेब्रुवारी २०२० रोजी पंढरपूरला जाण्यासाठी अकोला रेल्वेस्थानकावर आले. ते पोहोचेपर्यंत रेल्वे निघून गेल्यामुळे रात्र प्लॅटफार्मवरच काढायची असा निर्णय घेऊन हे दाम्पत्य झोपी गेले. पहाटेच्या सुमारास रेखा यांना जाग आल्यावर मुलगा दिसला नाही. त्यांनी संपूर्ण रेल्वेस्थानकावर शोध घेतला. त्यांच्यावर आभाळच कोसळले होते. आपल्या मुलाला कोणीतरी पळवून नेल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी रेल्वे पोलीस स्थानक गाठले. रेल्वे पोलीस उपनिरीक्षक शेंडगे यांनी सर्व चौकशी केल्यावर मुलाचे अपहरण झाल्याच्या निष्कर्षाप्रत ते पोहोचले अन् सुमितचा शोध सुरू झाला. पोलिसांच्या तपासात सुमितला १८ फेब्रुवारीच्या रात्री अकोल्याच्या रेल्वेस्थानकावरून गीता मालाकार नावाच्या भिकारी महिलेने उचलून नेल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी तपासाचे चक्र फिरविले दरम्यान, एक मुलगा बेवारसस्थितीत नागपुरातील रामझुल्या खाली असल्याची माहिती नागपूरच्या महिला बालविकास अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी मुलास ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीनंतर शिशुगृहात दाखल केले. हा मुलगा अकोल्याहून हरविलेल्या मुलाच्या वर्णनाशी साधर्म्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अकोला बालविकास कार्यालयाला माहिती दिली. दरम्यान, रेल्वे पोलिसांनीही तपासचक्र फिरवून व १६ मे रोजी या महिलेला ताब्यात घेतले असता तिने अपहरण केल्याचे मान्य केले. या महिलेला नागपुरातील गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. हा मुलगा १६ मे रोजी सापडल्यानंतर त्याची ओळख पटविण्यात आली. हा आपला सुमितच आहे, हे पाहून पवार कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही; मात्र कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्याशिवाय सुमित परत मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्याने त्यांचा हिरमोड झाला.
मुलगा सापडल्याच्या आनंदात त्यांनी विलंबातही समाधान मानले; परंतु सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतरही नागपूरच्या महिला व बालकल्याण समितीला निर्णय देण्यासाठी तब्बल दोन महिन्यांचा अवधी लागला. नागपूर बालकल्याण समितीने संवेदनशीलता दाखवित या प्रकरणात तत्परता दर्शविली असती तर माय-लेकरांची भेट व्हायला तब्बल दोन महिन्यांचा अवधी लागला नसता. या संदर्भात प्रतिक्रीयेसाठी नागपुरच्या बाल कल्याण समितीसोबत संपर्क होऊ शकला नाही.


अकोला बालकल्याण समितीने नागपूरच्या बालकल्याण समितीला तत्काळ ईमेल करुन माहिती दिली होती. त्यांच्या सूचनेनुसार कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करुन आम्ही पोलिसात तक्रारही नोंदविली. परंतु, नागपुरच्या बैठका आॅनलाईन असल्याने व ते ठराविक दिवशीच बैठक घेत असल्यामुळे हस्तांतरण निर्णय उशिरा झाला.
- पल्लवी कुळकर्णी, अध्यक्षा
बाल कल्याण समिती, अकोला


आामच्याकडून संपूर्ण माहिती वेळेवर बालकल्याण समिती यांना देण्यात आली. मधल्या काळात कोरोनामुळे बालकल्याण समितीची बैठक होत नसल्याने, शिवाय हस्तांतरणाची प्रक्रिया न्यायालयीन असल्याने बालकल्याण समितीचा आदेश वेळेवर मिळाला नाही. जसा आदेश मिळाला तसा तत्काळ अकोला बालकल्याण समितीला सादर करण्यात आला.
- अपर्णा कोल्हे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, नागपूर

Web Title: The boy was found ... but it took two months to hand him over to his parents!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.