मुलाचा मृतदेह आढळला; आई बेपत्ता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:18 AM2021-04-15T04:18:33+5:302021-04-15T04:18:33+5:30
घातपाताची शक्यता: महिलेच्या पतीने घेतले पोलीस ठाण्यात वीष बाळापूर : शहरानजीकच्या मन नदी पात्रात बुधवारी सकाळी १५ वर्षीय युवकाचा ...
घातपाताची शक्यता: महिलेच्या पतीने घेतले पोलीस ठाण्यात वीष
बाळापूर : शहरानजीकच्या मन नदी पात्रात बुधवारी सकाळी १५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला असून, मुलाची आई बेपत्ता आहे. दरम्यान, महिलेच्या पतीने बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन विषप्राशन केल्याने पोलिसांनी घातपाताची शक्यता वर्तविली आहे. प्रसाद प्रकाश चितरंग (रा. बाळापूर नाका, अकोला) असे मृत युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहरानजीक वाहणाऱ्या मन नदी पात्रात युवकाचा मृतदेह आढळून आला. तसेच पुलावर स्कुटी मोटार सायकल क्रमांक (एम.एच. २८ ए.वाय. ७३४०) ही दिसून आली. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी मजुरांना विचारणा केली असता दोन जणांनी नदीपात्रात उडी घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून बाळापूर पोलिसांनी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपतकालीन पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधला. दीपक सदाफळे यांच्या पथकाद्वारे नदीपात्रात दुसऱ्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत मृतदेह आढळून आला नव्हता. दरम्यान, मृत युवकाचा मामा गणेश गोविंद पाटील (रा बुलडाणा) याने बाळापूर पोलिसात फिर्याद दिली की, त्याची बहीण मनिषा गोविंद पाटिल हिचा विवाह बाळापूर नाका, अकोला येथील रहिवासी प्रकाश चितरंग यांच्यासोबत झाला होता. त्यांना प्रसाद हा एकुलता एक मुलगा आहे. बहीण मनिषा चितरंग ही आरोग्य विभागात नोकरी करते. जावाई प्रकाश चितरंग यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर मनिषाने त्याच विभागातील व्यक्तीशी लग्न केले; मात्र बुधवारी सायंकाळी मनिषाचा मुलगा प्रसादचा मृतदेह नदीपात्रात आढळला, तर मनिषाही बेपत्ता असल्याने तिनेही नदीपात्रात उडी घेतल्याचा संशय व्यक्त करीत पोलीस शोध घेत आहेत. वृत्त लिहेस्तोर बाळापूर पोलीस स्टेशनला घटनेची कुठलीही नोंद नव्हती.
----------------------------
महिलेच्या पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
काही दिवसांपूर्वी मनिषा चितरंग हिचा दुसरा विवाह झाला होता. बुधवारी प्रसाद प्रकाश चितरंग याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती व मनिषा चितरंग बेपत्ता असल्याने मनिषाच्या पतीने बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन विषप्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला बाळापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविले.