कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी धर्मगुरुंच्या बैठकीत मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:53 AM2021-02-20T04:53:25+5:302021-02-20T04:53:25+5:30

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन अकोला - समाजात धर्मगुरूंना मानाचे स्थान आहे. आपण सांगितलेलं लोक ऐकतात. आपला जनतेत प्रभाव ...

Brainstorming at a meeting of clergy to prevent the spread of corona | कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी धर्मगुरुंच्या बैठकीत मंथन

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी धर्मगुरुंच्या बैठकीत मंथन

Next

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

अकोला - समाजात धर्मगुरूंना मानाचे स्थान आहे. आपण सांगितलेलं लोक ऐकतात. आपला जनतेत प्रभाव आहे. या प्रभावाचा वापर आपण जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी करावा. आपापली प्रार्थनास्थळे व त्या ठिकाणी येणारे भाविक श्रद्धाळू यांचे नियोजन तर आपण करालच, मात्र त्या सोबतच आपापल्या भागातील लोकांना सुचना करुन त्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्यासाठी प्रवृत करणे, लोकांनी स्वतःहून चाचण्या करुन घेणे यासाठी आपण आवाहन व प्रयत्न करावे. विविध धर्मगुरु, पुजारी, महंत यांनी प्रशासन आणि जनतेतील दुवा व्हावे व प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विविध धर्मगुरु तसेच धार्मिक स्थळांचे प्रमुख यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस पोलिस अधिक्षक जी. श्रीधर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण, प्रभारी मनपा आयुक्त पंकज जावळेकर, प्रांताधिकारी डॉ. नीलेश अपार, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख आदी तसेच विविध धर्मिय धर्मगुरु व देवस्थान प्रमुख उपस्थित होते.

सुरुवातीला उपस्थित धर्मगुरुंनी आपापली भुमिका मांडून प्रशासनाला सहकार्य करण्याबाबत आश्वस्त केले. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी उपस्थितांना कोविड च्या वाढत्या संक्रमणाबाबत व त्यास जबाबदार असलेल्या दैनंदिन जीवनातील सवयींबाबत सांगितले. त्या अनुषंगाने धार्मिक स्थळांवर कोणासही विना मास्क प्रवेश देण्यास मनाई करावी,असे आवाहन केले. डॉ. फारुख शेख यांनी सामूहिक प्रार्थना करतांना त्या प्रार्थनास्थळांवर मर्यादित लोकांना प्रवेश द्यावा, जेणे करुन सामाजिक अंतर राखणे शक्य होईल. प्रार्थनेचा मुख्य भाग काही प्रमुख लोकांनी करावा उर्वरित लोकांनी घरुन सहभागी व्हावे, असेही पर्याय सुचविले.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर म्हणाले की, केवळ लोकांवर कारवाई करुन दंड वसुली करुन हा प्रसार रोखणे अशक्य आहे. त्यात लोकांचे मतपरिवर्तन करुन त्यांना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत सवयी लावणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी धर्मगुरुंनी पुढाकार घ्यावा. पोलीस व प्रशासन हे त्यांच्या उपाययोजना करत राहतील, त्याला सर्वांच्या सहभागाची जोड आवश्यक आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले की, धार्मिक स्थळांवर कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी व तपासण्यासाठी प्रशासनाने फिरते पथके तयार केली आहेत, ते पाहणी करतील. ज्या ज्या धार्मिक स्थळांवर ध्वनिक्षेपकांची सोय आहे त्याचा वापर लोकांना सुचना देण्यासाठी आपण करावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले.

प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण यांनी प्रास्ताविक, सुत्रसंचलन केले व उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: Brainstorming at a meeting of clergy to prevent the spread of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.