रंग मिसळून ब्रॅन्डेड कंपन्यांच्या नावाने विदेशी दारूची निर्मिती!
By admin | Published: June 30, 2017 01:04 AM2017-06-30T01:04:18+5:302017-06-30T01:04:18+5:30
आरोपीस अटक: मध्य प्रदेशातून आणायचा बॉम्बे व्हिस्की, दारूच्या रिकाम्या बाटल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : खदान परिसरातील सचिन हिरामण रोकडे याच्या घरातून पोलिसांनी बुधवारी रात्री १ लाख ६३ हजार रुपयांचा बनावट विदेशी दारूचा साठा जप्त केला. रोकडे याने महाराष्ट्रात बंदी असलेली मध्य प्रदेशातील बॉम्बे विस्की आणून आणि त्यात लाल रंग मिसळून ती दारू ब्रॅन्डेड कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून विक्री करण्याचा अवैध व्यवसाय घरीच सुरू केला होता; परंतु त्याचा हा व्यवसाय पोलिसांनी बुधवारी रात्री उघडकीस आणला.
सचिन रोकडे हा घरातून फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्या आईला ताब्यात घेतले होते. मध्य प्रदेशातील एका व्यक्तीकडून सचिन रोकडे हा बनावट दारू निर्मितीची माहिती घेऊन आला असून, काही महिन्यांपूर्वीच त्याने हा अवैध व्यवसाय सुरू केला आहे. मध्य प्रदेशातून दारू आणायची आणि ही दारू विविध ब्रॅन्डेड कंपनीच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरायची. एका मशीनच्या साहाय्याने दारूच्या बाटल्या सीलबंद करायच्या. विदेशी दारू दर्शविण्यासाठी तो रासायनिक रंगाचा वापर करायचा. पोलिसांनी त्याच्या घरातून रंग आणि दारूच्या बाटल्या सीलबंद करण्याची मशीन जप्त केली. पोलिसांनी १ हजार ६०० हून अधिक खाली बॉटल, ७५० मि.ली.च्या २६० बॉटल किंमत ९३ हजार ६०० रुपये, महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली बॉम्बे स्पेशल व्हिस्की यामध्ये फेरबदल करून विकण्यात येणाऱ्या १८० मि.ली.च्या १६३ सीलबंद बॉटल किंमत २२ हजार ८२० रुपये, असा एकूण १ लाख १६ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल त्याच्या घरातून जप्त केला. सचिन रोकडे याने शहरात कोणाला ही दारू विकली, तो मध्य प्रदेशातून कोणाकडून दारू, रिकाम्या बाटल्या आणायचा, याचा शोध खदान पोलीस घेणार आहेत.
रोकडेला केली अटक
४बुधवारी रात्री पोलिसांनी छापा मारल्यावर आरोपी सचिन रोकडे हा घरातून फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्या आईला ताब्यात घेतले. गुरुवारी दुपारी रोकडे याला खदान परिसरातून ठाणेदार गजानन शेळके, एएसआय गोपीलाल मावळे, किशोर सोनोने, सागर भारस्कर यांनी अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.