‘ब्रेक द चेन’मुळे उद्योगांना लागला ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:18 AM2021-05-10T04:18:19+5:302021-05-10T04:18:19+5:30
अकोला : राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध लागू आहेत. जिल्ह्यात सोमवारपासून कडक निर्बंध लावण्यात आल्याने औद्योगिक क्षेत्रावर याचा ...
अकोला : राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध लागू आहेत. जिल्ह्यात सोमवारपासून कडक निर्बंध लावण्यात आल्याने औद्योगिक क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होणार आहे. नियमानुसार इनसाईट उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी आहे. शहरात केवळ ४ ते ५ टक्केच इनसाईट उद्योग आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण उद्योग क्षेत्राला ‘ब्रेक’ लागला आहे.
अकोला जिल्ह्यात ७०० ते ८०० मोठे, मध्यम व लघुउद्योग आहेत. त्यापैकी ५० टक्के उद्योग कृषी आधारित आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या उद्योगांमध्ये हजारो मजूर काम करतात. मागीलवर्षी लॉकडाऊनमुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. अनलॉकमध्ये नव्या जोमाने उद्योग सुरू झाले. उद्योग रुळावर येत असताना कोरोनाचा पुन्हा उद्रेक सुरू झाल्याने संपूर्ण क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यातही आता जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लावल्याने उद्योगांची चाके पुन्हा रुतली आहेत. जिल्ह्यातील जवळपास ९५ ते ९६ टक्के उद्योग बंद राहणार असल्याचे उद्योजकांनी सांगितले.
--बॉक्स--
औद्योगिक वसाहती आणि सुरू राहणारे उद्योग (टक्क्यांत)
अकोला - ४ टक्के
बाळापूर - २ टक्के
मूर्तिजापूर - २ टक्के
पातूर - ० टक्के
अकोट - ० टक्के
--कोट--
कामगारांना हवे काम
कोरोना काळात कामासाठी अडचणी येत आहेत. काही उद्योग सुरू असल्याने थोड्याफार प्रमाणात काम मिळत होते. आता कडक निर्बंधांमुळे उद्योग बंद राहणार आहेत. पुन्हा रोजगार मिळणार की नाही? सांगता येत नाही.
- बाबुलाल नेमाडे
--कोट--
रोजगार मिळत नसल्याने घरखर्च भागविणे कठीण झाले आहे. उद्योगही कमी प्रमाणात सुरू असल्याने कामही मिळत नाही. एखाद्यावेळी दोन दिवसांचे काम मिळते, पण जास्त काळ काम मिळत नाही.
- विष्णू पाटील
--कोट--
उद्योजकांच्या अडचणी वेगळ्या
जिल्ह्यात ३ ते ५ टक्केच इनसाईट उद्योग आहेत. मालक, सुपरवायझर यांना जाण्याची परवानगी नाही. त्यामुळे सगळ्याच उद्योगांवर परिणाम होणार आहे. उद्योजक पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.
- उन्मेश मालू, उद्योजक
--कोट--
आधीच काम कमी होते. उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू झाले नव्हते. या निर्बंधामुळे उद्योग पूर्णपणे बंद राहणार आहेत. माल पडून राहणार असल्याने उद्योजक आर्थिक संकटात लोटला जाण्याची शक्यता आहे.
- श्रीकांत पडगीलवार, उद्योजक
--कोट--
या निर्बंधांमध्ये उद्योग सुरू ठेवायला परवानगी द्यायला हवी होती. एकवेळ बंद झालेले उद्योग पुन्हा रुळावर यायला मोठा कालावधी लागतो. उद्योजकांचे झालेले नुकसान भरून निघत नाही. आर्थिक अडचणी वाढतात.
- हरेश शाह, उद्योजक
--बॉक्स--
कच्चा माल मिळण्यास अडचणी
राज्यात संचारबंदी लागू असल्याने कच्चा माल मिळण्यास अडचणी येत आहेत. उत्पादनांचा पुरवठा, पॅकेजिंग, मटेरिअल, यंत्रांचे सुटे भाग मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे बहुतांश उद्योग अडचणीत आले आहेत. अनेक उद्योगांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. हे नुकसान भरून निघायला अजून बराच कालावधी लागणार आहे.