‘एचआरसीटी’चाचणीच्या नावाखाली होणाऱ्या लुटीला ब्रेक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:16 AM2020-09-29T11:16:47+5:302020-09-29T11:17:04+5:30
सर्वसामान्यांच्या या लुटीला ब्रेक लावून शासनाने ‘एचआरसीटी’चाचण्यांचे दर निश्चित केले आहेत.
अकोला: जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असल्याने नागरिक धास्तावले आहेत. हीच संधी साधत काही खासगी रुग्णालयांमध्ये एचआरसीटी चाचणी करणे सक्तीचे करून त्यासाठी जादा पैसे आकारण्याचे प्रकार वाढले होते. सर्वसामान्यांच्या या लुटीला ब्रेक लावून शासनाने ‘एचआरसीटी’चाचण्यांचे दर निश्चित केले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाय योजना केल्या जात आहेत. यानंतरही कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांमधील याच भीतीचा फायदा घेत खासगी रुग्णालयांमध्ये एचआरसीटी चाचणी सक्तीची केल्याचे प्रकार घडले आहेत. शिवाय, यासाठी जादा शुल्कही आकारण्यात येत होते. गरज नसताना सातत्याने केली जाणारी तपासणी अन् त्यातील रेडिएशनमुळे शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो. एखाद्या रुग्णाला खरच एचआरसीटीची गरज असल्यास डॉक्टर तसे सुचववितातही; परंतु डॉक्टरांचे अशा प्रकारे कुठल्याही स्वरूपाचे प्रिस्क्रीप्शन नसतानाही अनेकांनी एचआरसीटी चाचणी करून घेतली आहे. जवळपास चार ते साडेचार हजार रुपये एका चाचणीसाठी आकारले जात होेते. चाचणीच्या नावावर रुग्णांची होत असलेली लूट शासनाच्या निदर्शनास येताच शासनाने दर निश्चित करून या प्रकाराला ब्रेक लावला.
असे आहेत निश्चित दर
- १६ पेक्षा कमी स्लाइस क्षमतेच्या मशीनसाठी -२००० रुपये
- १६ ते ६४ स्लाइस क्षमतेच्या मशीनसाठी - २५०० रुपये
- ६४ पेक्षा जास्त स्लाइस क्षमतेच्या मशीनसाठी - ३००० रुपये
तर रुग्णालयावर कारवाई
खासगी रुग्णालयांसह संबंधित केंद्रांना ‘एचआरसीटी’ चाचणीचे निश्चित दरपत्रक दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे. निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त शुल्क आकारल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे शासनाच्या निर्णयात म्हटले आहे.
शासनाने एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित करून दिले आहेत. या दरापेक्षा जास्त दराने शुल्क आकारल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.