कडक निर्बंधात वैवाहिक जीवनातील कलहाला ब्रेक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:23 AM2021-06-09T04:23:26+5:302021-06-09T04:23:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : लाॅकडाऊन काळात संपूर्ण कुटुंबच घरामध्ये अडकल्याने दैनंदिन आयुष्याचे गणित बिघडले. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : लाॅकडाऊन काळात संपूर्ण कुटुंबच घरामध्ये अडकल्याने दैनंदिन आयुष्याचे गणित बिघडले. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. रोजगाराचे साधन हिरावले गेले. या आरोग्य, आर्थिक चिंतेच्या कठीण काळात महिलांवर अत्याचार झाले. कोरोना विषाणू संसर्गाचे संकट पाहता २०२० मधील लाॅकडाऊनमध्ये वैवाहिक जीवनात माेठ्या प्रमाणात पती-पत्नींमध्ये कलह हाेऊन तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या, त्या २०२१ मधील कडक निर्बंधामध्ये काही अंशी कमी झाल्याचे भरोसा सेलकडे प्राप्त तक्रारीवरून समोर आले आहे.
जिल्ह्यात वाढता काेराेना संसर्ग पाहता २०२० मध्ये लाॅकडाऊन लावण्यात आले, त्यानंतर जून महिन्यात अनलाॅक करण्यात आले. २०२० मध्ये एकूण् ३१२ तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या. यापैकी १११ प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता, तर १०३ प्रकरणात समेट घडवून आणण्यात आला हाेता. ३२ प्रकरणात परस्पर घटस्फोट तर १५ प्रकरणे जिल्हा वर्ग, ५१ प्रकरणे पाेलीस ठाण्याला परत पाठविण्यात आली. २०२१च्या जानेवारी ते ३१ मे अखेरपर्यंत एकूण १२७ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १२७ प्रकरणात समेट घडविण्यास यश आले. ३६ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून, ६४ प्रकरणे प्रलंबित आहेत.
१३० पती-पत्नींचे भांडण सोडविले
हाताला काम नाही यामुळे निर्माण झालेल्या घरातील चिडचिड्या वातावरणामुळे किरकाेळ कारणावरून वाद झालेल्या एकूण १३० प्रकरणात महिला सुरक्षा कक्षाच्यावतीने त्यांचा समेट घडवून आणला. आज ही कुटुंबे व्यवस्थित जीवन जगताना दिसून येत आहेत. यामध्ये २०२० मधील १०३ तर चालूवर्षातील २७ भाडणांचा समावेश आहे.
वादाचे मुख्य कारण मद्यप्राशन
लाॅकडाऊनमध्ये व कडक निर्बंधात बऱ्याचवेळी दारूची दुकाने बंद असताना सुद्धा सर्वाधिक तक्रारी दारू पिऊन वाद घालणे व पत्नीस मारहाण केल्याच्या आहेत. तसेच माेबाईलवर संभाषण करीत पत्नी राहते याच्याही काही तक्रारी असून, घरगुती वादाची प्रकरणे आहेत.
पतीच्या प्रेमसंबंधामुळे कुटुंबात कलह
अकोट तालुक्यातील एका गावातील व्यक्तीचे लग्न झाल्यानंतरही प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून नेहमीच कुटुंबात कलह निर्माण व्हायचा. यासंदर्भात २०२० मध्ये तक्रार दाखल करण्यात आली हाेती.
गत २०२० व २०२१ मध्ये एकूण महिला अत्याचाराच्या ४३९ तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या. यापैकी २४१ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. चालू वर्षातील प्रलंबित असलेली प्रकरणे साेडविण्यात येणार आहेत.
- संजीव राऊत
प्रमुख भरोसा सेल