मेडीकलचे शटर तोडून लाखाचा ऐवज लपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 12:16 PM2020-03-06T12:16:45+5:302020-03-06T12:16:52+5:30
दत्त मेडिकलमध्ये गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने प्रवेश केला.
अकोला : गोरक्षण रोड स्थित दत्त मेडिकल गुरुवार ५ मार्च रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने फोडली. चोरट्याने मेडिकलच्या गल्ल्यातील रोख एक लाख १५ हजार रुपये लंपास केले. या प्रकरणी तक्रारीवरुन खदान पोलिसांनी गुरुवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरक्षण रोडवरील दत्त मेडिकलमध्ये गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. यानंतर चोरट्याने लोखंडी रॉडच्या सहायाने मेडिकलचा गल्ला फोडून एक लाख १५ हजार रुपये लंपास केले. गुरुवारी सकाळी भूपेश सुभाशचंद्र मुंदडा (३७) हे मेडिकल उघडण्यासाठी आले असता, त्यांनी मेडिकलच्या शटरचे कुलुप तुटलेले आढळून आले. त्यांनी शटर उघडताच मेडिकलमधील गल्ला फुटलेला होता. गल्ल्यातील १ लाख १५ हजार रुपयांची रक्कमही आढळून आली नाही. मेडिकलमध्ये चोरी झाल्याचा प्रकार लक्षात येताच त्यांनी खदान पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले व घटनेचा पंचनामा करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी भूपेश सुभाशचंद्र मुंदडा (वय ३७) यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी चोरट्याविरुद्ध कलम ४६१, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सीसी कॅमेरात घटना कैद
दत्त मेडिकलमध्ये झालेली घटना सीसी कॅमेरात कैद झाली आहे. घटनेचा पंचनामा करताना पोलिसांनी मेडिकलमधील सीसी कॅमेराचे फुटेज तपासले असता, चोरीचा प्रकार सीसी कॅमेरात कैद झाल्याचे दिसून आले. फुटेजमुळे पोलिसांनी चोरट्याचा तपास घेण्यास मदत होणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.