औषध पुरवठ्याला ‘ब्रेक’!
By admin | Published: May 17, 2017 02:31 AM2017-05-17T02:31:55+5:302017-05-17T02:31:55+5:30
कोट्यवधींची देयके थकीत : सर्वोपचारमध्ये औषधांविना उपचाराची डॉक्टरांवर नामुष्की
सदानंद सिरसाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासकीय रुग्णालयांना औषध पुरवठ्याची तीन कोटी रुपयांपर्यंतची देयके थकल्याने जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात गेल्या महिनाभरापासून औषधांचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या भांडारातील जवळपास १९ औषधांचा साठा संपलेला आहे. विविध रोगांवर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषध आणण्याची चिठ्ठी देण्याची वेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आली आहे.
सर्वोपचार रुग्णालयात जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांची प्रचंड धाव आहे. दैनंदिन वाढत्या रुग्णसंख्येचा वैद्यकीय अधिकारी, अधिपरिसेविका, रुग्णालयीन कर्मचाऱ्यांसह औषधसाठ्यावरही त्याचा ताण वाढतो. त्यातच गेल्या महिनाभरापासून सर्वोपचार रुग्णालयात औषध पुरवठ्याचे कंत्राट मिळालेल्या विविध संस्थांचे जवळपास तीन कोटी रुपयांचे देयक थकीत आहे.
मार्च अखेरनंतरही देयक न मिळाल्याने संबंधितांनी थेट औषध पुरवठाच बंद केला आहे. त्यामुळे साठा असेपर्यंत रुग्णांना वाटप झाले. गेल्या वीस दिवसांपासून विविध प्रकारच्या १९ औषधांचा साठा संपलेला आहे. मधुमेह, रक्तदाब, आम्लपित्त, लोह, बी कॉम्प्लेक्स, विविध तापाच्या औषधांचा त्यामध्ये समावेश आहे.
त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची केवळ तपासणी करणे, एवढेच काम सुरू आहे. आवश्यक औषध बाहेरून विकत आणण्यासाठीचे ‘प्रिस्क्रिप्शन’ जवळपास सर्वच डॉक्टरांकडून दिले जात आहे. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांना नाइलाजाने ते विकत आणावे लागत आहे. त्यातून शासनाची सार्वजनिक आरोग्यसेवा कोलमडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दोन महिन्यांपासून निधीला ठेंगा
- सर्वोपचार रुग्णालयात दरकरारानुसार पुरवठादारांना आदेश देण्यात आले. संबंधित संस्थांनी औषध पुरवठा केल्यानंतर त्यांची देयके शासनाकडून प्राप्त अनुदानातून दिली जातात. ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंत संस्थांनी औषधांचा पुरवठा केला.
- त्यापोटी त्यांना तीन कोटी रुपयांचे देयक अदा करावयाचे आहे. त्यासाठी सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाने शासनाकडे निधीची मागणीही केली; मात्र मार्च, एप्रिल आणि आता मे आटोपत असला, तरी शासनाकडून निधी मिळालेला नाही.
- एकीकडे पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाचा शासनाकडून गाजावाजा सुरू असताना रुग्णांसाठी आवश्यक औषधांसाठी निधी दिल्या जात नसल्याचाही प्रकार घडत आहे.
भांडारात नसलेली औषधे
सर्वोपचारच्या भांडारात गेल्या महिनाभरापासून संपुष्टात आलेल्या १९ औषधे आहेत. त्यामध्ये फियालोपेरिडॉल, ग्लिबेन क्लेमाइड, अॅम्लोडिपाइन, फोलिक अॅसिड, सोफ्रामायसिन क्रिम, फ्रुसेमाईड, फ्लू कॅमेझोल, फेरस सल्फेट प्लस फोलिक अॅसिड, इटोफिलाइन्स आणि थिओफीलाइन, एरिथ्रोमायसिन, डिआॅक्झिन-०.२५, अॅक्लोविरा क्रिम, कॉप्रिमायसिन सिरप, क्लोटोमायसिन, कॅल्शिअम लॅक्टेट, व्हिटामिन डी-५००, बिसाकोडिल, बी-कॉम्प्लेक्स, अॅण्टासिड, अॅमॉक्झिलिन सिरप, अॅम्पिसिलीन या औषधांचा समावेश आहे.
जीव वाचविणाऱ्या औषधांचाच तुटवडा
सर्वोपचारमध्ये तुटवडा असलेली औषधे जीव वाचविणाऱ्या आहेत. ऐनवेळेवर रुग्णांना ते न मिळाल्यास तो दगावू शकतो. त्यासाठी नातेवाइकांना विकत आणणे भागच पडते. तुटवडा असलेल्या औषधांमध्ये मानसिक रोगी, मधुमेह, रक्तदाब, महत्त्वाची जीवनसत्त्वे, जखमा भरणाऱ्या क्रिम, हृदय, मूत्राशयाचे क्रिटिकल रुग्ण, त्वचारोगी, गर्भवती महिला, अस्थमा, हृदय बंद पडणारे रुग्ण, घसा, हाडांचे फ्रॅक्चर, शौचास साफ न होणे, आम्लपित्त आणि प्रतिजैविकांचा समावेश आहे. त्यामुळे आता सर्वोपचारमध्येही क्रिटिकल रुग्णावर उपचार महाग झाले आहेत.
पुरवठादारांच्या थकीत देयकांसाठी निधी मिळण्याचा प्रस्ताव शासनाकडे मार्चमध्येच सादर केला आहे. जवळपास तीन कोटी रुपयांचे देयक थकीत आहेत. अद्याप निधी मिळाला नाही. त्यामुळे संबंधितांनी औषधांचा पुरवठा थांबविला आहे.
- डॉ. राजेश कार्यकर्ते,
अधिष्ठाता, सर्वोपचार रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महा. अकोला.
--