राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 02:53 PM2018-08-12T14:53:18+5:302018-08-12T14:56:11+5:30
अकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाला निधीअभावी ब्रेक लागल्याची माहिती आहे. बांधा, वापरा, हस्तांतरित करा, या तत्त्वावर सुरू असलेल्या बांधकामासाठी बँकांकडून निधी उभारण्यात अडचणी असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.
- सदानंद सिरसाट
अकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाला निधीअभावी ब्रेक लागल्याची माहिती आहे. बांधा, वापरा, हस्तांतरित करा, या तत्त्वावर सुरू असलेल्या बांधकामासाठी बँकांकडून निधी उभारण्यात अडचणी असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सातत्याने तसेच चार दिवसांपूर्वी ‘आयटीएनएल’ या कंत्राटदार कंपनीला पत्र देत कामाची गती वाढविण्याचे सांगितले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण सुरू झाले. अमरावती ते चिखलीपर्यंत १९४ किलोमीटरचे काम चार टप्पे करण्यात आले. त्यातील अमरावती-खामगाव-चिखली या टप्प्याचे काम गेल्या जूनपासून बंद असल्याची माहिती आहे. यादरम्यान, कंत्राटदार कंपनीने तुकड्यातील कामे उपकंत्राटदारांना दिले आहेत. वेगवेगळ्या उपकंत्राटदारांकडून चौपदरीकरणाचे काम सुरू होते; मात्र जूनपासून रस्त्याच्या कामाची गती मंदावली. कंत्राटदार कंपनीला बँकांकडून निधी उभारणीत अडचण असल्याची माहिती आहे. त्यासाठी बँक स्तरावर कंपनीच्या बैठका सुरू आहेत. त्यातील तपशील कळू शकलेले नाहीत. त्यातच पावसाळा सुरू झाल्याने त्या कारणाने काम बंद ठेवण्याची संधी कंत्राटदार कंपनीला मिळाली; मात्र कंत्राटदार कंपनीचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत मे २०१९ च्या मुदतीत काम पूर्ण करण्याचा करारनामा झाला आहे. ठरवून दिलेल्या मुदतीत दोन टप्प्यातील कामे ठरलेल्या काही प्रमाणात अपूर्ण आहेत. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवून त्या-त्या ठरावीक मुदतीत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे. सद्यस्थितीत कामाच्या गतीबद्दल शासनाला कळविण्यात आले आहे. त्याशिवाय, दरमहा कामाचा प्रगती अहवालही शासनाला पाठविला जातो. गेल्या काही दिवसांत बंद असलेल्या कामासंदर्भात कंत्राटदार कंपनीला महामार्ग प्राधिकरणाकडून सातत्याने विचारणा करण्यात आली.
ठरल्याप्रमाणे जुलै २०१८ या महिन्यातील कामाचा प्रगती अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला प्राप्त झाला नाही. त्यासाठीचे पत्र प्राधिकरणाने चार दिवसांपूर्वीच कंत्राटदार कंपनीला दिले आहे. दरम्यान, महामार्गावर विविध ठिकाणी असलेली अवजड यंत्रेही संबंधित उपकंत्राटदार कंपन्यांनी कॅम्पमध्ये जमा केल्याची माहिती आहे.
- ६४ पुलांची निर्मिती
अमरावती-मूर्तिजापूर-बोरगाव मंजू परिसरात लहान पुलांची निर्मिती होत आहे. चिखलीपर्यंत १४ लहान पूल बांधले जाणार आहेत, त्यानंतर वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून लवकरच आणखी ५० पुलांची निर्मिती होणार आहे.
कंत्राटदार कंपनीने अधिकृतपणे काम बंद असल्याचे सांगितले नाही. त्याचवेळी जुलैचा प्रगती अहवाल दिला नाही, त्यामुळे कंपनीला विचारणा करण्यासोबतच कामाची गती वाढविण्याचे पत्र दिले. मे २०१९ पर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण न झाल्यास किंवा काही ठरावीक कामे मुदतीत पूर्ण न झाल्यास दंडाची तरतूद आहे.
-विलास ब्राम्हणकर, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती विभाग.