सिटी बसचा ठराव विखंडित करा

By Admin | Published: October 9, 2015 01:41 AM2015-10-09T01:41:25+5:302015-10-09T01:41:25+5:30

ठराव विखंडित करण्याच्या मागणीसाठी मित्र पक्ष शिवसेनेची आयुक्तांकडे धाव.

Break the resolution of the city bus | सिटी बसचा ठराव विखंडित करा

सिटी बसचा ठराव विखंडित करा

googlenewsNext

अकोला: शहर बस सेवा सुरू करण्याच्या विषयावर सखोल चर्चा न करता भाजपाने घाईघाईत बस सेवेच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यावर आक्षेप घेत मित्र पक्ष शिवसेनेने हा ठराव विखंडित करण्याच्या मागणीसाठी आयुक्त अजय लहाने यांच्याकडे धाव घेतली. बस सेवेचा करार संशयास्पद आणि मनपाचे आर्थिक नुकसान करणारा असल्याचा आरोप करीत गुरुवारी शिवसेनेने भाजपावर जोरदार हल्लाबोल चढविला. अकोलेकरांच्या सेवेत दाखल असलेल्या शहर बस वाहतुकीचे तीन तेरा वाजले. यापूर्वी शहर बस वाहतूक चालविण्याचा कंत्राट घेतलेल्या संस्थेचे दिवाळे निघाले. मनपाकडे रॉयल्टीची रक्कम जमा केल्याने थकबाकीचा बोजा वाढत गेला. अखेर मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी भंगार अवस्थेतील बस सेवा बंद केली. यावर उपाय म्हणून पुन्हा नव्याने सिटी बस सुरू करण्याचा प्रस्ताव सत्ताधार्‍यांनी मांडला असता, त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी होकार दिला. २७ मे २0१५ रोजीच्या सभेत बस सेवेच्या विषयाला स्थगिती देण्यात आली. तेव्हापासून प्रत्येक सभेत हा विषय आपसूकच बारगळला गेला. अचानक २ सप्टेंबर रोजीच्या सर्वसाधारण सभेत भाजपाचे गटनेता हरीष आलिमचंदानी यांनी अवघ्या दहा मिनिटात बस सेवेच्या विषयावर चर्चा करून निविदेला घाईघाईत मंजुरी देण्यात आली. हा करार संशयास्पद असून, यावर चर्चा करण्याची आग्रही मागणी शिवसेनेच्या गटनेत्या मंजूषा शेळके यांनी लावून धरली होती. मध्यंतरी सेनेच्या नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन हा विषय रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मात्र अचानक सेनेने विरोध गुंडाळला. या मुद्यावर लोकमतने लिखाण करताच खडबडून जागे झालेल्या उपमहापौर विनोद मापारी यांसह सेनेच्या नगरसेवकांनी गुरुवारी आयुक्तांची भेट घेऊन तब्बल दोन तास चर्चा केली. तसेच सीटी बसचा ठराव विखंडित करण्याची मागणी लावून धरली. यावेळी निवासी उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, गटनेत्या मंजूषा शेळके, शरद तुरकर, पंकज गावंडे, गणेश पावसाळे, राजकुमारी मिश्रा, किशोर ठाकरे, सुभाषमामा म्हैसने, भरत सत्याल उपस्थित होते.

Web Title: Break the resolution of the city bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.