आचारसंहितेत ‘जलयुक्त शिवार’च्या ४७९ कामांना ब्रेक! जिल्ह्यात १,१९५ कामांना प्रशासकीय मान्यता
By संतोष येलकर | Published: April 3, 2024 04:41 PM2024-04-03T16:41:59+5:302024-04-03T16:42:15+5:30
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या कामांपैकी १ हजार १९५ कामांना दोन महिन्यांपूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ९० कामे पूर्ण करण्यात आली
अकोला : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या कामांपैकी १ हजार १९५ कामांना दोन महिन्यांपूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ९० कामे पूर्ण करण्यात आली असून, १८१ कामे सुरू असली तरी, लोकसभा निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेत प्रशासकीय मान्यता आणि ‘वर्क आॅर्डर ’ बाकी असलेल्या ‘जलयुक्त शिवार’च्या ४७९ कामांना ‘ब्रेक’ लागला आहे.
जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत २०२३-२४ या वर्षासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत जिल्ह्यातील १३१ गावांची निवड करण्यात आली असून, संबंधित गावांच्या शिवारात जलयुक्त शिवारची कामे करण्यासाठी १३१ कोटी ७० लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला. त्यामध्ये जलयुक्त शिवारची विविध १ हजार ६७४ कामे मंजूर करण्यात आली. त्यापैकी १ हजार १९५ कामांना दोन महिन्यांपूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असली तरी त्यापैकी ९० कामे पूर्ण करण्यात आली असून, १८१ कामे सुरू आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय मान्यता आणि कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर ) बाकी असलेली जिल्ह्यातील ‘जलयुक्त शिवार’ची ४७९ कामे थांबल्याचे चित्र आहे.
४७९ कामांना प्रशासकीय मान्यता; वर्क ऑर्डर बाकी!
जलयुक्त शिवार अभियानमध्ये जिल्ह्यात मंजूर १ हजार ६७४ कामांपैकी ४७९ कामांना प्रशासकीय मान्यता आणि कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. लोकसभा निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या कालावधीत या कामांच्या प्रशासकीय मान्यतासह ‘वर्क ऑर्डर’ देता येणार नसल्याने, आचारसंहितेत या कामांना ‘ब्रेक’ लागल्याचे चित्र आहे.
मान्यता असूनही ९२४ कामे रेंगाळली!
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात १ हजार १९५ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ९० कामे पूर्ण करण्यात आली असून, १८१ कामे सुरू असली तरी, मान्यता असूनही उर्वरित ९२४ कामे रेंगाळल्याचे चित्र आहे.
अशी आहेत कामे!
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील १३१ गावांत १ हजार ६७४ जलयुक्त शिवारची विविध कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामध्ये ढाळीचे बांध, शेततळे, नाला खोलीकरण व रुंदीकरण, सिमेंट नाला बंधारे, द्वारयुक्त बंधारे, बांधावरील वृक्षलागवड व कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे.