शेगाव-पंढरपूर पालखी मार्गाच्या कामाला ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 04:01 PM2020-03-06T16:01:23+5:302020-03-06T16:01:31+5:30
शेगाव-पारस-अकोला-वाडेगाव-डव्हा-रिसोड-किनगावजट्टू-बीबी या मार्गावर वाहनधारकांना धुळीतून रस्ता शोधत प्रवास करावा लागत आहे.
- सदानंद सिरसाट
अकोला : शेगाव-पंढरपूर पालखी मार्गाचा भाग असलेल्या अकोला-वाशिम-बुलडाणा जिल्ह्यातील रस्त्याचे काम कमालीचे संथ गतीने सुरू आहे. या कामाची गती वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदार मे. सुधीर कन्स्ट्रक्शन्स इन्फ्रास्पेस प्रा.लि. यांना वर्षभरात ३९ पत्रे दिल्यानंतरही त्यामध्ये सुधारणा झालेली नाही. शेगाव-पारस-अकोला-वाडेगाव-डव्हा-रिसोड-किनगावजट्टू-बीबी या मार्गावर वाहनधारकांना धुळीतून रस्ता शोधत प्रवास करावा लागत आहे. त्यासोबतच ‘हायब्रीड अॅन्युइटी मोड’ अंतर्गत सुरू असलेल्या इतर तीन रस्त्यांची कामेही याच पद्धतीने सुरू असून, विकास नको, प्रवाशांचे जीव वाचवा, असेच म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे.
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पंढरपूर-शेगाव पालखी मार्गाची सुधारणा केली जात आहे. या रस्त्याच्या दुपदरीकरणासोबत दोन्ही बाजंूना पादचारी मार्ग तयार केला जात आहे. अकोला-वाशिम-बुलडाणा या तीन जिल्ह्यांतील ८२ किमीचे काम निविदेतून नागपूर येथील मे. सुधीर कन्स्ट्रक्शन्स इन्फ्रास्पेस प्रा.लि. यांना मिळाले. ५ फेब्रुवारी २०१९ पासून कार्यारंभ आदेशानुसार २४ महिन्यांत ते पूर्ण करण्याची मुदत आहे. तसेच ठरल्याप्रमाणे फेब्रुवारी २०२० मध्ये २५.६२ टक्क्यांऐवजी १८ टक्केच पूर्ण झाले आहे. कंत्राटदार कंपनीने या रस्त्याच्या दोन्ही बाजंूना खोदून मातीकाम केले. त्यानंतर सप्टेंबर २०१९ पासून कामही जवळपास बंदच ठेवले. त्यामुळे या रस्त्यावर धुळीचे लोट उडत आहेत. त्याचा दुचाकीधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातूनच अपघाताची संख्याही वाढली आहे.
- तीन जिल्ह्यांतील वाहनधारकांना त्रास
पालखी मार्गानुसार अकोला-वाशिम-बुलडाणा जिल्ह्यांतील रस्त्याचा समावेश असलेल्या शेगाव-नागझरी-पारस-निमकर्दा-गायगाव-अकोला-गोरेगाव-वाडेगाव-डव्हा-रिसोड-लोणी-बीबी-किनगावजट्टू यादरम्यान ३७१ कोटी रुपये खर्चातून हे काम केले जात आहे. काम थंडबस्त्यात असल्याने ४ फेब्रुवारी २०२१ पर्यंतच्या मुदतीत पूर्ण होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
- कापशी-कारंजा रस्त्याचे कामही थांबले!
‘एचएएम’अंतर्गत असलेल्या कापशी-बार्शीटाकळी-पिंजर-कारंजा या ४८ किमी रस्त्याच्या कामाच्या करारनाम्यानुसार तीन टप्पे पूर्ण झाले. आता निधी नसल्याने ते थांबले आहे.
- आडसूळ-तेल्हारा, माळेगाव-अकोटचाही गोंधळ
सुधीर कन्स्ट्रक्शन्सकडे तेल्हारा-अकोला मुख्यालय जोडणाऱ्या तेल्हारा-आडसूळ-गांधीग्राम रस्ता, सोबतच वरवट बकाल-माळेगाव बाजार-तेल्हारा-मुंडगाव-अकोट या रस्त्यांची कामेही आहेत. त्या रस्त्यांचीही पालखी मार्गासारखीच अवस्था झाली आहे.