पहाटे कटाई, रात्री वाहतूक!
By admin | Published: February 19, 2016 02:06 AM2016-02-19T02:06:30+5:302016-02-19T02:06:30+5:30
पातूर, बाश्रीटाकाळी तालुक्यात सागवान तस्कर सक्रिय.
पातूर/ सायखेड: शासन वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, वृक्षांची सुरक्षा यावर कोट्यवधी रुपये खर्च करीत असले तरी वनसंपदेची नियोजनबद्ध कत्तल केली जात असल्याचे वास्तव ह्यलोकमतह्ण चमूने केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आले. पातूर व बाश्रीटाकळी तालुक्यात पहाटे कटाई करायची व रात्री लाकडांची वाहतूक करायची, अशी सागवान तस्कारांची कार्यपद्धती असल्याचे दिसून आले. सागवान तस्करांपुढे वन, महसूल, पोलिसांची गस्त निष्प्रभ ठरत असल्याचे धक्कादायक चित्रही यानिमित्ताने पाहावयास मिळाले.
पातूर तालुका हा चोहोबाजूंनी टेकड्यांनी वेढलेला असून, जंगलाचे परिक्षेत्र मोठय़ा प्रमाणात आहे. दिवसेंदिवस वाढतच असलेल्या वृक्षतोडीमुळे तालुक्यात पूर्वीसारखा पाऊस पडत नसल्याचे पर्यावरण जाणकारांचे मत आहे. बाश्रीटाकळी तालुक्यात सागवान वृक्षांची कत्तल होत असल्याचे चित्र आहे.
नैसर्गिक आपत्तीमध्ये सागवान कोसळणे तर तस्करांच्या पथ्यावर पडते. ही झाडे वन विभागाकडून जमा करण्यापूर्वीच त्यांची विल्हेवाट लावण्यात येते. त्यामुळे वनसंपदेची होणारी कत्तल रोखण्यासाठी प्रशासनाने विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था व ग्रामस्थांच्या मदतीने अँक्शन प्लॅन राबविणे आवश्यक आहे, यावर स्टिंग ऑपरेशनच्या निमित्ताने शिक्कामोर्तब झाले.
आरामशीनही केली होती जप्त
वर्षांपूर्वी पातूर शहरात दंगल उसळली होती. दंगलीदरम्यान शहरामध्ये मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुजावरपुरा परिसरात वनविभागाने अवैध सागवान व्यावसायिकांवर कारवाई केली होती. या कारवाईत लाखो रुपयांचे सागवान व आरामशीन जप्त करण्यात आल्या होत्या.
कुठे काय आढळले..?
पातूर वनपरिक्षेत्र अंतर्गत माळराजुरा, आलेगाव, देवठाणा, आसोला, मोर्णा धरण, घाट, पांगराबंदी आदी परिसरात वनतस्करीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र स्टिंग ऑपरेशनदरम्यान दिसून आले. पातूर वनविभाग अंतर्गत येणार्या जंगलातील सागवान, आडजात लाकडे व वनसंपत्तीचे जतन व रक्षणाच्या दृष्टीने वनाधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. सागवान तस्करी रोखण्यासाठी संबंधित वनक्षेत्रात कर्मचार्यांना गस्त घालण्याचे आदेश आहेत. त्याचप्रमाणे लाकडांची अवैध वाहतूक रोखावी, यासाठी वनउपज नाके उभारण्यात आले. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येतात; मात्र हे नाके केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे वनतस्करांचे चांगले फावले आहे.
माळराजुरा-घाट रस्त्यावर लोकमत चमूने पहाटे फेरफटका मारला. काही सागवान वृक्षांची कटाई झाल्याचे दिसून आले. या ठिकाणी झाड कोसळलेल्या अवस्थेत होते. दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा याच ठिकाणची पाहणी केली असता, तेथे ते सागवानचे झाड नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पहाटे वृक्षतोड आणि रात्री वाहतूक अशी पद्धतीने सागवान तस्कर सक्रिय असल्याचे दिसून आले.
बाश्रीटाकाळी तालुक्यातील मांडोली वनशिवारात लोकमत चमूने फेरफटका मारला. या ठिकाणी दुपारी वृक्षांची पाहणी करून रात्र होण्यापूर्वी त्यांची कत्तल करण्यात येत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पहाटे लाकडांची वाहतूक असल्याचे पाहावयास मिळाले.