लाचखोर हेडकॉन्स्टेबल गजाआड
By admin | Published: February 27, 2016 01:39 AM2016-02-27T01:39:16+5:302016-02-27T01:39:16+5:30
जुने शहर पोलीस स्टेशनमध्येच गुन्हा दाखल.
अकोला: शिवसेना वसाहत येथील युवकाने दिलेल्या तक्रारीवर कारवाई टाळण्यासाठी तीन युवकांजवळून सहा हजार रुपयांची लाच घेणार्या जुने शहर पोलीस स्टेशनमधील एका हेडकॉन्स्टेबलला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहात अटक केली. साहेबराव वानखडे असे पोलिसाचे नाव असून, त्याच्याविरुद्ध जुने शहर पोलीस स्टेशनमध्येच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना वसाहत येथील रहिवासी सचिन अंबरते नामक युवक याच परिसरातील रहिवासी एका युवकाच्या दुचाकीमधील जानेवारी महिन्याच्या अखेरीस बॅटरी चोरत असताना एका महिलेने आरडाओरड केली. त्यामुळे बाजूलाच उभ्या असलेल्या तीन युवकांनी सचिन अंबरते याला मारहाण केली होती. त्यामुळे अंबरते याने या प्रकरणाची तक्रार जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये करून तीनही युवकांवर कठोर कारवाईची मागणी केली होती; मात्र पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवले. त्यानंतर शिवसेना वसाहत परिसराचे बिट जमादार साहेबराव वानखडे याने सदर तक्रारीवर त्या तीनही युवकांशी संपर्क साधून तुमच्यावर कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. तसेच ही कारवाई टाळायची असेल तर तिघांनीही प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याची मागणी केली; मात्र युवकांना लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानंतर शुक्रवारी दुपारी पोळा चौकातील पोलीस चौकीत सहा हजार रुपयांची लाच देवाण-घेवाण करण्याचे ठरले. यावेळी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख उत्तम जाधव यांच्या पथकानेही सापळा रचला. युवकांनी सहा हजार रुपयांची लाच साहेबराव वानखडे याच्या हातात देताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वानखडे याला लाच घेताना रंगेहात अटक केली. या प्रकरणी वानखडे याच्याविरुद्ध तो कार्यरत असलेल्या जुने शहर पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.