भूमी अभिलेख खात्यातील लाचखोर मुख्यालय सहायक जाळ्य़ात
By admin | Published: April 29, 2016 02:01 AM2016-04-29T02:01:45+5:302016-04-29T02:01:45+5:30
जळगाव जामोद येथील घटना; एक हजार रुपयांची लाच घेणे भोवले.
जळगाव जामोद (जि. बुलडाणा): शेतातील मोजणी करून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख (नझूल) कार्यालयातील मुख्यालय सहायक वर्ग-३ सुरेश रामचंद्र बोरसेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी गुरुवारी रंगेहात पकडले. शेतमालक अशोक लपटणे व शेत जमिनीचे खरेदीदार अमिरखान मजीदखान यांनी भूमी अभिलेख विभागात रीतसर पावती भरून मोजणी करण्याबाबत अर्ज केला. या मोजणीसाठी ६ हजारांची अति तातडीची फीदेखील जमा करण्यात आली होती; मात्र शेताची मोजणी झाली नाही. जमीन मोजणीसाठी बोरसे यांनी अमिरखान व शेतमालक अशोक लपटणे यांनी मोजणीबाबत विचारणा केली असता बोरसे याने त्यांच्याकडे एक हजाराची लाच मागितली व ही रक्कम २८ एप्रिल रोजी घेऊन येण्यास सांगितले. दरम्यान, अमिरखान यांनी लाचलुचपत प्रतिबधंक विभागाला यासंदर्भात माहिती दिली. २८ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधकाने सापळा रचून बोरसेला रंगेहात पकडून त्याच्या विरुद्ध कलम ७,१३, (१) (ड) सह १३ (२) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली.