लाचखोर वनरक्षक जेरबंद
By admin | Published: January 29, 2015 12:45 AM2015-01-29T00:45:40+5:302015-01-29T00:45:40+5:30
अकोला एसीबीची परतवाडा येथे कारवाई; अपघातग्रस्त कार सुपूर्दनाम्यावर देण्यासाठी मागितली होती एक लाखाची लाच.
अकोला - वन्य प्राणी अपघातप्रकरणात वन विभागाकडे जप्तीत असलेले वाहन सोडविण्यासाठी तब्बल एक लाख रुपये लाचेची मागणी करणारा अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील वनरक्षक दिनेश विनायक वाट याला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी ७0 हजार रुपयांची लाच घेताना परतवाडा येथून रंगेहात अटक केली. मोठय़ा साहेबांच्या नावावर ही रक्कम मागण्यात आली असून, यामध्ये आणखी काही अधिकार्यांचा समावेश आहे का, याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे.
तक्रारदार एम एच ३0 टीसी १४३ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने १९ जानेवारी रोजी परतवाड्याजवळील बहीरम येथे यात्रेसाठी जात असताना, त्याच्या कारची एका खांबाला धडक लागली. या अपघाताच्यावेळी बाजूलाच असलेले काही पोलीस कारजवळ आले आणि या कारने एका काळविटाला धडक दिल्याने काळविटाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कारने कोणत्याही काळविटाला धडक दिली नसल्याचे तक्रारकर्त्याने सांगितले; मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या पोलीस कर्मचार्यांनी बहीरम येथील एका पोलीस चौकीमध्ये कार जमा करून परतवाडा वनपरिक्षेत्रातील वनरक्षक वाट याला बोलविले आणि कार वन विभागाच्या जप्तीत दाखविली. तक्रारकर्त्याने कार सोडण्याची विनंती केली; मात्र सुपूर्दनाम्यावर कार सोडविण्यासाठी मोठय़ा साहेबांना एक लाख रुपये द्यावे लागतील, असे वाट याने सांगितले. तक्रारकर्त्याने एक लाख देण्यास नकार दिल्यानंतर ७0 हजार रुपयांमध्ये तडजोड झाली. दरम्यान, तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २१ ते २७ जानेवारी या कालावधीत वाट याच्याविरुद्ध पंचासंमोर पडताळणी कारवाई केली असता, वाट याने मोठय़ा साहेबांकडून काम करून देण्यासाठी ७0 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार २८ जानेवारी रोजी दिनेश वाट याला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. याप्रकरणी परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनात पथकाने केली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून आणखी काही अधिकारी अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.