लग्नाच्या दिवशी वधू-वरांचा नेत्रदानाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:14 AM2020-12-27T04:14:18+5:302020-12-27T04:14:18+5:30
‘सावधान….शुभ मंगलम’ झाल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. वधू-वरांनी एकमेकांच्या गळ्यात पुष्प माळा घातल्या. दोघांनी जीवनबंधनाची गाठ बांधली आणि लगेच नेत्रदान ...
‘सावधान….शुभ मंगलम’ झाल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. वधू-वरांनी एकमेकांच्या गळ्यात पुष्प माळा घातल्या. दोघांनी जीवनबंधनाची गाठ बांधली आणि लगेच नेत्रदान करण्याचा संकल्प करीत असल्याची घोषणा त्यांनी केली व प्रमाणपत्र मिळविले. हा एक आगळा वेगळा प्रेरणा देणारा संकल्प युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस प्रा. निनाद संजय मानकर व गौरी अरविंद चित्रकार यांनी केला आहे.
लग्नाच्या दिवशी प्रा. निनाद मानकर व गाैरी चित्रकार यांनी दिशा आय बँक अमरावती (दिशा ग्रुप) या समितीकडे अर्ज भरून मरणाेत्तर नेत्रदानाचा संकल्प करून समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे. निनाद आणि गौरी यांचा नुकताच विवाह संपन्न झाला असून, त्यादिवशी लग्नानिमित्त दोघांनीही मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करून दिशा आय बँक अमरावती (दिशा ग्रुप) या नेत्रदान समितीकडे अर्ज करून नोंदणी केली आहे. मरणोत्तर आम्ही जग बघणार व तसेच इतरांनाही या कार्यासाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरून गरजूंना याचा लाभ होईल, असे युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निनाद मानकर यांनी सांगितले.
---------
वऱ्हाडी स्नेहीजनांना आवाहन
लग्नसाेहळ्यात आलेल्या वऱ्हाडी मंडळी व स्नेहजनांना नेत्रदानाचे महत्त्व सांगून प्रत्येकाने हा संकल्प करावा, अशी विनंती वधू-वरांनी केली. त्यांच्या या आवाहनाने मंडपात एकच टाळ्यांचा गडगडाट झाला. त्यांच्या या कार्याचे उपस्थित सर्वांनी कौतुक केले.