नवरीच्या पाठवणीसाठी दुचाकीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 05:07 PM2020-04-22T17:07:11+5:302020-04-22T17:07:17+5:30
विवाहानंतर नवरी मुलगी विवाहानंतर नवरदेवाच्या दुचाकीवरून सासरी रवाना झाली.
मूर्तिजापूर : गतवर्षी साक्षगंध झाले आणि आदिवासी रीतिरिवाजाप्रमाणे २० एप्रिल रोजी विवाह ठरला; मात्र अचानक कोरोना विषाणूचे संकट आल्याने जमावबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील हयातपूर कुरूम येथील मारोती संस्थान जय माँ चैतन्य शक्ती आत्मिक व आध्यात्मिक सेवा केंद्राच्यावतीने नियोजित विवाह २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. विवाहानंतर नवरी मुलगी विवाहानंतर नवरदेवाच्या दुचाकीवरून सासरी रवाना झाली. गत पंधरवड्यात तालुक्यात अशा प्रकारे पार पडलेला हा दुसरा विवाह आहे.
मूर्तिजापूर तालुक्यातील नागठाणा येथील बाळू जगन सोळंके यांची मुलगी स्नेहाचा विवाह, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिवरा बुद्रूक येथील अजय महादेव चव्हाण यांचा मुलगा आनंद याच्याशी गतवर्षी २४ एप्रिल रोजी ठरला. यावर्षी २० एप्रिल ही विवाहाची तारीख आणि घटका निश्चित करण्यात आली; मात्र सद्यस्थितीत ‘लॉकडाउन’मुळे जमावबंदी असल्याने सगळे रीतिरिवाज बाजूला सारून अगदी साध्या पद्धतीने वैदिक रिवाजाप्रमाणे पाच लोकांच्या उपस्थितीत श्री मारोती संस्थान जय माँ चैतन्य शक्ती आत्मिक व आध्यात्मिक सेवा केंद्राचे संस्थापक गौरीशंकर महाराज, गौरीअम्मा यांच्यावतीने वर-वधूंचा लागणारा सर्व खर्च करून वैदिक पद्धतीने आदर्श विवाह सोहळा हयातपूर कुरूम येथे संपन्न झाला. विवाहासाठी नवरा मुलगा दुचाकीवरून आपल्या मोजक्याच नातेवाइकांसह लग्नमंडपी दाखल झाला. वधू पक्षाकडून आई, वडील व भाऊ उपस्थित होते. काही निवडक वºहाडी मंडळीची उपस्थिती होती. लग्नानंतर नववधू स्नेहा हिला नवरदेव चक्क आपल्या दुचाकीवरून आपल्या गावी घेऊन गेल्याने कुतूहल व्यक्त करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)