लग्न लागताच नवरी फुर्र; नवरदेवाला घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 09:02 PM2018-06-05T21:02:39+5:302018-06-05T21:05:43+5:30
राजस्थानातील तरुण ठरला औटघटकेचा नवरदेव
अकोला : लग्न म्हणजे दोन जिवांचे मिलन. सुंदर, सालस मुलगी पसंत करून, लग्न करून सुखी संसार थाटावा, हे प्रत्येकाचे स्वप्न असते; परंतु झालेले लग्न जर औटघटकेचे ठरले तर स्वप्नांचा चुराडा होतो. असाच काहीसा प्रकार सोमवारी दुपारी अकोल्याजवळील रिधोरा गावाजवळ घडला. राजस्थानच्या युवकासोबत लग्नाचे सात फेरे घेतल्यानंतर नवरी व तिचे नातेवाईक ५0 हजार रुपयांसह पसार झाले. फसवणूक झालेल्या युवकाच्या तक्रारीची बाळापूर पोलिसांनी नोंद केली.
देखणी, सुंदर मुलगी मिळावी आणि संसार सुखाचा व्हावा, असे स्वप्न अनेक जण रंगवतात. राजस्थानामधील एक ३0 वर्षीय युवक असेच स्वप्न रंगवित असताना, त्याला अकोल्यात एका मध्यस्थ व्यक्तीमार्फत एका युवतीकडून लग्नाचा प्रस्ताव आला. मध्यस्थाने युवती लग्नाची आहे. लग्नासाठी मुलीकडच्या लोकांना खर्चासाठी ५0 हजार रुपये द्यावे लागतील, असे युवकाला सांगितले. युवकही तयार झाला. सोमवारी तो अकोल्यात आल्यावर त्याला खदान परिसरातील एक युवती मध्यस्थाने दाखविली. मुलगी पसंत आल्यावर मध्यस्थाने लग्न उरकून घेण्याची घाई केली. युवकही बोहल्यावर चढण्यास चटकन तयार झाला. मध्यस्थ, युवती आणि तिच्या काही नातेवाइकांनी रिधोरा येथील एका मंदिरामध्ये लग्न लावण्याची तयारी दर्शवल्यानंतर सर्वजण मंदिरात आले. याठिकाणी मध्यस्थ, नातेवाइकांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह लावण्यात आला. एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातल्यानंतर सात फेरे घेण्यात आले आणि लग्न पार पडले. लग्न आटोपले. आता नवरीला राजस्थानला घेऊन जाऊ, या विचारात नवरदेव होता; परंतु आपल्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे, याची त्याला जराही कल्पना नव्हती.
रिधोराजवळील एका हॉटेलवर नवरदेवाच्या खर्चाने सर्वांनी अल्पोपहार घेतला. यावेळी नवरी सासरी रवाना होण्यापूर्वी आम्ही तिची नातेवाइकांची शेवटची भेट घडवून आणतो. नंतर नवऱ्या मुलीची भेट होणार नाही, असे नातेवाइकांनी नवरदेवाला सांगितले. नवरदेवानेही होकार दिल्यामुळे नवरीसह तिचे नातेवाईक निघून गेले. काही वेळातच मध्यस्थ व्यक्तीही पसार झाला. खूप वेळ वाट पाहिल्यानंतरही नवरीला घेऊन तिचे नातेवाईकही आले नाहीत. कोणाचा संपर्क क्रमांक नसल्याने आता काय करावे, या विवंचनेत नवरदेव पडला. आपली फसवणूक झाल्याची जाणीव होताच, नवरदेवाने सोमवारी दुपारी कोतवाली पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली; परंतु घटनास्थळ हे बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने, पोलिसांनी बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यामुळे नवरदेवाने बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
बनावट लग्न लावून फसवणूक करणारी टोळी सक्रीय
लग्नासाठी इच्छुक असलेल्या परप्रांतीय युवकांना हेरून त्यांना मुली दाखवण्यात येतात आणि त्या मुलींचा वापर करून बनावट लग्न लावून युवकांकडून लाखो रुपये उकळले जातात. नंतर काहीतरी कारण सांगून मुलीसह तिचे सहकारीसुद्धा पैसे घेऊन गायब होतात. यापूर्वी अकोल्यात असे प्रकार अनेकदा घडले आहेत. या घटनांवरून अकोल्यात बनावट लग्न लावून फसवणूक करणारी एक टोळीच सक्रिय आहे.