ब्रिज कोर्सने होणार शैक्षणिक वर्षाची सुरुवात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 11:19 AM2021-06-27T11:19:47+5:302021-06-27T11:22:00+5:30
Bridge course will start the academic year : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) ब्रिज कोर्स तयार केला आहे.
- नितीन गव्हाळे
अकोला : यंदा २८ जूनपासून अकोला जिल्ह्यातील शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू होताच, विद्यार्थ्यांना एक नवीन ब्रिज कोर्स (सेतू अभ्यासक्रम) शिकावा लागणार आहे. राज्यातील सरकारी आणि खासगी शाळांतील इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) ब्रिज कोर्स तयार केला आहे.
कोरोनामुळे गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद आहेत. आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका टळलेला नाही. यंदा शिक्षण विभागाने २८ जूनपासून विद्यार्थ्यांविना शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांना ५० टक्के उपस्थित राहावे लागणार आहे. नववी ते दहावी, बारावीच्या शिक्षकांना व मुख्याध्यापकांना शाळेत १०० टक्के हजेरी द्यावी लागणार आहे. दीड वर्षापासून विद्यार्थी शाळेपासून वंचित आहेत. त्यात कोरोनासारखा साथीचा जीवघेणा आजार त्यांनी पाहिला किंवा अनुभवला आहे. अशा सर्व परिस्थितीचा विचार करता, यंदा शाळा सुरू झाल्यानंतर अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी प्रत्येक शाळेला हा ब्रिज कोर्स पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षण विभाग देणार आहे. या ब्रिज कोर्सच्या निर्मितीसाठी तज्ज्ञांचे विषयनिहाय गट तयार करण्यात आले आहेत. शैक्षणिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम तयार असल्याचे शाळा सुरू झाल्यानंतर थेट अभ्यासक्रम शिकवण्यापेक्षा शैक्षणिक नुकसान झालेली पोकळी भरून काढणे गरजेचे आहे. यासाठी ब्रिज कोर्स महत्त्वाचा आहे.
जूनपासून राज्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असते. प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या किंवा नाही झाल्या तरी या ब्रिज कोर्सपासूनच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात व्हावी यादृष्टीने शिक्षण विभागाचे नियोजन आहे.
ब्रिज कोर्स कसा असेल?
या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी ज्या इयत्तेत त्यांना हा ब्रिज कोर्स मागील अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. शाळा बंद असल्याने तसेच ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांना ज्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नाहीत; पण ज्याच्याशिवाय पुढील अभ्यासक्रम शिकता येणार नाही. अशा बाबींचा समावेश कोर्समध्ये करण्यात आला आहे.
प्रत्येक इयत्तानिहाय व विषयनिहाय ब्रिज कोर्स स्वतंत्र असणार आहे. हा ब्रिज कोर्स ४५ दिवसांचा असणार आहे.
पुढील वर्गात प्रवेश करत असताना विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या अध्ययन निष्पत्ती व संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का, हे तपासण्यासाठी किंवा त्या अधिक प्रभावीपणे शिकवण्यासाठी हा ब्रिज कोर्स मदत करेल.
ब्रिज कोर्स शिकवल्यानंतरच विद्यार्थ्यांना चालू इयत्तेतील अभ्यासक्रम शिकवता येणार आहे.
हा ब्रिज कोर्स सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी अशा सर्व शाळांसाठी असणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या प्रत्येक शैक्षणिक व्यवस्थापनाला ब्रिज कोर्स शिकवण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहेत.
मुलांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी हा ब्रिज कोर्स राज्यस्तरावर तयार केला आहे. शाळा बंद असल्याने मागील इयत्तेतून वरच्या इयत्तेत गेलेल्या विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम निश्चितच लाभदायी ठरणार आहे.
-डॉ. ज्ञानेश्वर नागरे, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अकोला.
पुढील इयत्तेत शिक्षण घेत असताना अनेक गोष्टी पूर्वज्ञानावर अवलंबून असतात. त्या मुलांच्या पूर्ण करण्याचा हेतू आहे. मुलांच्या आकलनापासून ते सर्जनशीलतेकडे शिकण्याचा प्रवास होण्यासाठी ब्रिज कोर्स मधल्या कृती साहाय्यभूत ठरतील.
-डॉ. जितेंद्र काठोळे, राज्यस्तरीय ब्रिज कोर्स निर्मिती सदस्य
लॉकडॉऊन काळात ग्रामीण, दुर्गम आणि अतिदुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा शैक्षणिक फटका बसल्याचे दिसून आले. लॉकडॉऊनमध्ये विद्यार्थ्यांच्या यापूर्वी जे मुलांना येत होते. त्यातूनही मुले थोडी मागे गेल्याचे निदर्शनास आले. त्यासाठी ब्रिज कोर्स अत्यंत आवश्यक आहे.
-डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक