पिंपळडोळीनजीक पूल खरडून गेल्याने नऊ गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:23 AM2021-08-24T04:23:28+5:302021-08-24T04:23:28+5:30
पांढुर्णा : जिल्ह्याच्या टोकावर व पातूर तालुक्यातील पिंपळडोळी परिसरात दि.२२ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे नदी-नाले तुडुंब वाहत ...
पांढुर्णा : जिल्ह्याच्या टोकावर व पातूर तालुक्यातील पिंपळडोळी परिसरात दि.२२ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे नदी-नाले तुडुंब वाहत होते. आलेगाव-वाशिम मार्गावरील असलेल्या पिंपळडोळीनजीक पूल निर्गुणा नदीला आलेल्या पुरामुळे खरडून गेल्याने परिसरातील जवळपास नऊ ते दहा गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
पातूर तालुक्यातील चारमोळी, पिंपळडोळी परिसरात रविवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे पिंपळडोळीनजीकचा पूल हा पूर्ण खरडून गेल्यामुळे परिसरातील दहा गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. वाशिम जिल्ह्याला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्याने नेहमीच वर्दळ असते. दरम्यान, पूल खरडून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे गावांत एखादी आरोग्य संदर्भात समस्या उद्भवल्यास परिसरातील नागरिकांना पर्यायी मार्ग नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत. जिल्ह्याच्या मुख्यालयाला जोडणारा हा एकमेव मार्ग असल्याने या मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (फोटो)
--------------------------------
या गावांचा तुटला संपर्क
परिसरात रविवारी झालेल्या पावसामुळे निर्गुणा नदीला आलेल्या पुरामुळे पिंपळडोळीसह पांढुर्णा, चोंढी, चारमोळी, अंधारसांगावी, सोनुना, चोंढी, घोटमाळ, भौरदसह दहा गावांचा संपर्क तुटला आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन पुलाचे काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
------------------------------
चारमोळीचा पूलही गेला खरडून
पिंपळडोळीपासून नजीक असलेल्या चारमोळीचा पूलही नाल्याला आलेल्या पुरामुळे खरडून गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.