उज्ज्वला पुन्हा चुलीवर; कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:22 AM2021-08-13T04:22:52+5:302021-08-13T04:22:52+5:30
अकोला : दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या लाेकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे हाेणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त हेतूने केंद्र ...
अकोला : दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या लाेकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे हाेणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त हेतूने केंद्र सरकारने उज्ज्वला याेजनेंतर्गत गॅसचे वितरण केले. मात्र, गत काही महिन्यांत गॅसचे भाव गगनाला भिडल्याने तसेच सबसिडीही जवळपास बंदच झाल्याने उज्ज्वला याेजनेचे ग्रामीण भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र आहे.
स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्यालाच वाढत असून यामुळे सर्वांचेच ‘बजेट’ कोलमडत आहे. यात पगारदार, व्यावसायिकही चिंतित असताना अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्वयंपाकासाठी महिलांना वणवण भटकंती करीत सरपण जमा करावे लागते व धुराचा सामना करीत चूल पेटवावी लागते. केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान उज्ज्वला याेजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. मात्र, दरात हाेत असलेली वाढ लाभार्थींसाठी डोकेदुखी ठरत आहे. लाभार्थींना मोफत गॅस कनेक्शन मिळत आहे. मात्र, सिलिंडरच्या किमतीत झालेल्या दरवाढीने गॅस भरावा तरी कसा, असा प्रश्न पडत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत मिळालेले उज्ज्वला कनेक्शन
१,२६,०००
गॅस सिलिंडरचे दर (रुपयांत)
जानेवारी २०१९ - ७०९
जानेवारी २०२० - ७३२
जानेवारी २०२१ - ७४०
ऑगस्ट २०२१ - ८५५
सिलिंडर भरणे कसे परवडणार?
उज्ज्वला याेजनेंतर्गत गॅस मिळाल्याने खूप आनंद आला होता. मात्र, आता सिलिंडर खूप महाग झाले आहे. त्यामुळे आता तोंडचे पाणी पळाले आहे.
- नीता गवई
महागडा गॅस वापरणे परवडत नसल्याने चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ आमच्यासारख्यांवर आली आहे. त्यामुळे शासनाने गॅसवरील सबसिडी वाढवण्याची गरज आहे.
- भारती दाणे
घरातील खर्च भागवितांना नाकीनऊ येत आहेत. त्यात आता गॅस सिलिंडरचे दरही वाढत असल्याने गॅस वापरणे शक्य नसल्याने चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे.
- सारिका जाधव