पांढऱ्या पायाची आहेस, शेतीसाठी ३ लाख रूपये आण; विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्यांविरोधात गुन्हा
By नितिन गव्हाळे | Published: August 2, 2023 07:40 PM2023-08-02T19:40:32+5:302023-08-02T19:41:08+5:30
विवाहितेला माहेराहून शेती खरेदी करण्यासाठी तीन लाख रूपये आणण्याचा तगादा लावून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणात बोरगाव मंजू पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला.
अकोला : तू पांढऱ्या पायाची आहेस, उदासी आहे. असे सतत टोमणे मारणे आणि विवाहितेला माहेराहून शेती खरेदी करण्यासाठी तीन लाख रूपये आणण्याचा तगादा लावून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणात बोरगाव मंजू पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील वनोजा येथील निकिता आशिष पातोंड (२३) यांच्या तक्रारीनुसार वनोजा येथील आशिष बाळकृष्ण पातोंड याच्याशी एप्रिल २०१९ रोजी तिचे लग्न झाले. लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर तिचे पती, सासू व सासरे यांनी शेती विकत घेण्यासाठी वडीलांकडून ३ ते ४ लाख रूपये आणण्याचा तगादा लावला. पैसे आणण्यास विवाहितेने नकार दिल्यावर पतीने बेदम मारहाण केली. सासू, सासरे तर नेहमीच तू उदासी आहेस, पांढऱ्या पायाची आहे म्हणून हिणवायचे. याबाबत वडिलांना सांगितले.
त्यानंतर वडिलांनी ३ लाख रूपये दिले. त्यानंतरही त्रास कमी झाला नाही. गरोदर असताना, पती व सासरचे लोक गर्भपात करण्यासाठी दबाव टाकायचे. पुढे मुलगी झाल्यानंतरही पती व सासरच्या मंडळींच्या वागण्यात बदल झाला नाही. त्यानंतर समेटाचा अनेकदा प्रयत्न झाला. अखेर भरोसा सेलकडे तक्रार दिली. त्यानंतरही समेट घडविण्याचा प्रयत्न झाला. परंतु पतीने घटस्फोटाची मागणी केली. त्यामुळे बोरगाव मंजू पोलिसांनी विवाहितेच्या तक्रारीनुसार पती आशिष पातोंड, सासरे बाळकृष्ण तुळशीराम पातोंडे, सासू बेबीताई पातोंड यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.