ऑक्सिजनची शुद्धता पातळी ही १०० टक्क्यांपर्यंत आणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:16 AM2021-04-26T04:16:19+5:302021-04-26T04:16:19+5:30

अकोला : औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पातील ओझोन वायू निर्मिती प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती होत असते. त्या ऑक्सिजनची शुद्धता ...

Bring the purity level of oxygen to 100 percent | ऑक्सिजनची शुद्धता पातळी ही १०० टक्क्यांपर्यंत आणा

ऑक्सिजनची शुद्धता पातळी ही १०० टक्क्यांपर्यंत आणा

Next

अकोला : औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पातील ओझोन वायू निर्मिती प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती होत असते. त्या ऑक्सिजनची शुद्धता पातळी ही १०० टक्क्यांपर्यंत आणून तो वैद्यकीय वापर करण्याइतपत उपयुक्त बनवणे व आवश्यक कॉम्प्रेसर व अन्य यंत्रसामग्री उभारून हा ऑक्सिजन सिलिंडर्समध्ये भरणे, याबाबतच्या उपाययाेजना तातडीने पूर्ण करा, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी दिले.

जिल्ह्यातील महाराष्ट्र विद्युत निर्मिती कंपनीच्या (महाजेनको) पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्र येथे रविवारी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांचे समवेत पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल रहाटे, उपमुख्य अभियंता दाम्पोदर, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी तसेच महाजेनकोचे अन्य अधिकारी यांचा समावेश होता.

ना. तनपुरे यांनी वीज निर्मिती केंद्राची व ओझोनायझेशन प्लान्टची पाहणी केली. यासंदर्भात संभाव्य तांत्रिक अडीअडचणी व ऑक्सिजन उपलब्धतेच्या शक्यतांबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शनही केले.

सध्याच्या परिस्थितीत राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे, त्या पार्श्वभूमीवर पूरक तांत्रिक व्यवस्था उपलब्ध करून ऑक्सिजन उपलब्धतेला प्राधान्य द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

......................

तुटवडा गृहीत धरून नियाेजन करा

पारस येथील प्रकल्पात ऑक्सिजन निर्मिती करताना व त्याची उपलब्धता करताना वैद्यकीय निकषांची पूर्तता झाली पाहिजे, असे ना. तनपुरे यांनी स्पष्ट करून पर्यायी व आपत्तीच्या प्रसंगी उपयुक्त ठरणारी ही व्यवस्था हवी. शिवाय या ठिकाणी संभाव्य आपत्ती वा तुटवडा गृहीत धरून ऑक्सिजन साठ्याची सुविधाही उपलब्ध असणे हे सध्याच्या स्थितीत आवश्यक आहे. याबाबत नियाेजन करा, असे निर्देश ना तनपुरे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी काेराेना उपाययाेजनांबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त निमा अरोरा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. कुसुमाकर घोरपडे, बाळापूरचे उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.

Web Title: Bring the purity level of oxygen to 100 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.