पूर्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक !

By admin | Published: August 4, 2016 12:56 AM2016-08-04T00:56:06+5:302016-08-04T00:56:06+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील येरळी व खिरोडा येथील पुलाचे ऑडिट करण्याची गरज.

British bridge over Purna river dangerous! | पूर्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक !

पूर्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक !

Next

सुहास वाघमारे
नांदुरा (जि. बुलडाणा),दि. ३: बुलडाणा जिल्हय़ातील पूर्णा नदीवर सुमारे नव्वद वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी लोडबेअरिंग पद्धतीने बांधलेल्या येरळी व खिरोडा येथील पूल धोकादायक झाला आहे. महाड येथील दुर्घटनेच्या पृष्ठभूमीवर या पुलांचे शासनाने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पूर्णा नदीवरील येरळी येथील ब्रिटिशकालीन पुलाची निर्मिती इंग्रजांनी १९२६ मध्ये तर खिरोडा येथील याच नदीवरील पुलाचे बांधकाम १९३१ मध्ये लोडबेरिंग पद्धतीने करण्यात आले आहे. २00६ मध्ये आलेल्या महापुरामुळे येरळीच्या पुलाच्या दोन मोर्‍यांवरील स्लॅब वाहून गेल्याने पूल नादुरुस्त झाला होता. पुलाची डागडुजी केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. खिरोडा येथील पुलाचीही अशीच स्थिती आहे. या दोन्ही पुलांच्या बाजूला मागील सहा वर्षांपासून नवीन पुलांच्या कामाला प्रारंभ झाला. आज रोजी येरळीजवळील पुलाचे काँक्रिट वर्क पूर्ण झाले असून आजूबाजूचे काम मागील दोन वर्षांपासून रखडले आहे. खिरोडा येथील फक्त पुलाचे कॉलम उभे आहेत. नाइलाज असल्याने प्रवाशांना या धोकादायक पुलांवरून वाहतूक करावी लागत आहे. पावसाळ्यात पूर्णा नदीच्या पुराचे पाणी पुलावरून आठ ते दहा फूट वाहते. यामुळे दोन ते तीन दिवस वाहतूक बंदच असते. पूर ओसरल्यानंतर प्रत्येक वेळी पुलाची स्थिती तपासून त्यावरून वाहतूक सुरू करण्यात येते.

येरळी येथील पुलाबाबत ब्रिटिश यंत्रणेचे पत्र !
येरळीजवळील पूल दहा वर्षांपूर्वी नादुरुस्त झाला होता व त्यावरील दोन मोर्‍यावरील स्लॅब पुरात वाहून गेल्याने नवीन स्लॅब टाकण्यात आला; मात्र या पुलावर काही भागात भेगा पडल्या आहेत. या पुलाबाबत ब्रिटिशकालीन यंत्रणेचे पत्र सन २00८ मध्ये बांधकाम विभागाला प्राप्त झाल्याची माहिती आहे. त्यामुळे सदर पुलांची तपासणी होणे गरजेचे आहे.

"येरळी व खिरोडा येथील दोन्ही ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी सुरक्षित असून त्याबाबतची तपासणी करण्यात आली आहे. नवीन पुलांच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे."
- एस.पी. थोटांगे
कार्यकारी अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग, खामगाव.

Web Title: British bridge over Purna river dangerous!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.