१५ कि.मी.च्या मार्गाची ब्रॉडगेज प्रकल्पात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 02:41 AM2017-08-09T02:41:14+5:302017-08-09T02:43:08+5:30
अकोला : अकोला-खंडवा-रतलाम या मीटरगेज रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्धस्तरावर पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. या संपूर्ण प्रकल्पांतर्गत अद्याप सुरू असलेला शनावाद ते महू हा मीटरगेज रेल्वे मार्ग लवकरच बंद करण्यात येणार असून, या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान १५ कि.मी.चा विस्तारित अतिरिक्त रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
राम देशपांडे
लोकमत न्यूज नेटवर्क

मीटरेज रेल्वे मार्ग बंद करण्यापूर्वी द. मध्य रेल्वे प्रशासनाने अकोला-अकोट-खांडवा या दरम्यान धावणार्या महू पॅसेंजर आणि त्या चालविण्यासाठी लागणारे सर्व साहित्य खांडवा रेल्वे विभागाकडे सुपूर्द केले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने खांडवा-शनावाददरम्यानचा मीटरगेज रेल्वेमार्गही बंद केला; मात्र या संपूर्ण प्रकल्पात अजूनही सुरू असलेल्या शनावद ते रतलाम या मीटरगेज रेल्वे मार्गावर खांडवा रेल्वे विभागाकडे सुपूर्द करण्यात आलेली पॅसेंजर धावत आहे. या दोन रेल्वेस्थानकादरम्यान घनदाट अभयारण्य आणि डोंगर-दर्या असून, दरम्यानचा अतिदुर्गम प्रदेश वगळून १५ कि.मी.चा अतिरिक्त ब्रॉडगेज रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. हा प्रकल्प जलद गतीने मार्गी लागावा यासाठी भारतीय रेल्वे प्रशासन सज्ज झाले असून, लवकरच शनावाद-महूदरम्यानचा मीटरगेज रेल्वेमार्गसुद्धा बंद करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.