पायी चालण्याची सवय मोडली; नको त्या वयात गुडघा-कंबरदुखी लागली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:22 AM2021-09-24T04:22:26+5:302021-09-24T04:22:26+5:30
अकोला : कोरोनाकाळात नागरिक घरात बंद होते; त्यामुळे बहुतांश जणांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झाले. काहींचे अजूनही सुरू आहे. ...
अकोला : कोरोनाकाळात नागरिक घरात बंद होते; त्यामुळे बहुतांश जणांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झाले. काहींचे अजूनही सुरू आहे. मात्र, अशा विविध कारणांनी त्यांची चालण्याची सवय मोडली आहे. परिणामी, नको त्या वयात गुडघा-कंबरदुखी सुरू झाल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. अकोला शहर छोटे असले तरीही याचा विस्तार वाढू लागला आहे. राहायला घर मिळाले तरी मूलभूत गरजांसाठी शहरात यावे लागत असल्याने घरात अतिरिक्त गाडीची गरज भासत आहे. ही गाडी ताब्यात मिळाल्यानंतर पायी चालण्याचे प्रमाण कमी होत असून, घर ते ऑफिसचे अंतरही गाडीवरून कापले जात आहे. छोट्या-मोठ्या खरेदीसाठी जवळच जायचे असल्यास दुचाकीचा वापर केला जात आहे.
या कारणांसाठीच होतेय चालणे
ज्येष्ठ - व्यायाम म्हणून सकाळ आणि संध्याकाळ
महिला - किराणा दुकानापर्यंत किंवा रिक्षा मिळेपर्यंत.
पुरुष - गाडी लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत आणि केली तर शतपावली.
तरुणाई - गल्लीतील मित्र-मैत्रिणीच्या घरापर्यंत.
हे करून पाहा....
एक कि.मी. परिसरापर्यंत गाडीचा वापर टाळा.
कुठलेही काम करताना सहकाऱ्याची मदत कमीत कमी घ्या.
घाई नसेल त्यावेळी तरी लिफ्टचा वापर टाळा.
म्हणून वाढले हाडांचे आजार
सध्या विविध कारणांमुळे अनेकांची चालायची सवय मोडली आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. मैदानी खेळ, धावणे, चालणे बंद आहे. खानपानातही बदल झाला आहे. शरीराला कुठलाही व्यायाम नसल्याने अनेकांचे हाडांचे आजार बळावत आहेत.
ज्यांना चालणे शक्यच नाही, त्यांच्यासाठी...
चालण्याचा व्यायाम योग्य पद्धतीने केल्यास आरोग्याला कित्येक लाभ मिळतात; परंतु, अनेकांना पायी चालणे शक्य होत नाही. त्यांनी बसल्या ठिकाणी योगासने, प्राणायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेक स्नायूंची होणारी दुखापत टाळता येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.