बनावट दस्तऐवज तयार करून भूखंड विकणारा दलाल गजाआड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:55 AM2021-01-08T04:55:33+5:302021-01-08T04:55:33+5:30
प्राप्त माहितीनुसार, अकोला एमआयडीसी ट्रान्सपोर्ट नगरातील टीए ७८ भूखंडाचे बनावट कागदपत्रे बनवून, शासकीय प्लॉट विकण्यात आला होता. या ...
प्राप्त माहितीनुसार, अकोला एमआयडीसी ट्रान्सपोर्ट नगरातील टीए ७८ भूखंडाचे बनावट कागदपत्रे बनवून, शासकीय प्लॉट विकण्यात आला होता. या भूखंडाचे बनावट कागदपत्रे सन ऑगस्ट २०१७मध्ये तयार करून, डिसेंबर २०१७मध्ये अमरावती येथील प्रादेशिक कार्यालयाला आग लावून पुरावे नष्ट करण्यात आले होते. या प्रकरणाची तक्रार एमआयडीसी प्लॉट ऑनर असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश काबरा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी मुंबई (अंधेरी) येथे केली होती. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. चौकशीअंती या भूखंडावर बेकायदेशीर ताबा मिळवून, हा प्लॉट मौजी नामक उद्योजक यांना विकण्यात आला होता, अशी माहिती समोर आली होती. यावरून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी अमरावती परिक्षेत्र अधिकारी यांना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार तक्रार देऊन, अकोला एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३१ डिसेंबर २०१९ रोजी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दोषी कर्मचारी अविनाश चंदन, पुरुषोत्तम पेठकर, एरिया मॅनेजर ठोके यांना निलंबित करण्याचे आदेश १४ फेब्रुवारी २०१९ रोजी देण्यात आले होते. त्यानुसार, या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर ३१ डिसेंबर २०१९च्या रात्री १२.१० वाजताच्या सुमारास हे कर्मचारी आणि तत्कालीन प्रादेशिक अधिकारी कुंदा वासनिक व सेवानिवृत्त क्षेत्र व्यवस्थापक दिलीप झेंडूजी पाटील तसेच अकोला शहरातील व्यावसायिक विक्रम शहा यांच्या पत्नी कृपा शहा यांना अटक करण्यात आली होती. हे पाचही आरोपी जामिनावर आहेत. ४ जानेवारी २०२१ रोजी अटक करण्यात आलेल्या मो.इब्राहिम मो.अजिज याला न्यायालयात हजर केले असता, त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय सोनोने करीत आहेत.