सर्वोपचार रुग्णालयात दलाल पुन्हा सक्रिय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 04:14 PM2019-11-01T16:14:53+5:302019-11-01T16:15:09+5:30
रुग्णांना घेरून येथील दलाल त्यांची मदत तर करतात; पण त्या मोबदल्यात त्यांच्याकडून पैसेही घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वैद्यकीय प्रमाणपत्र असो वा वैद्यकीय चाचण्या पूर्ण करून देण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना पैसे मोजावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विविध वैद्यकीय चाचण्यांसाठी दलालांचे दर ठरले असून, काही डॉक्टरांकडूनही त्यांना आश्रय मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना विविध वैद्यकीय चाचण्यांसाठी एका वॉर्डातून दुसºया वॉर्डात जावे लागते; परंतु या ठिकाणी मार्गदर्शक सूचना फलक नसल्याने रुग्णांची फरपट होते. या रुग्णांना घेरून येथील दलाल त्यांची मदत तर करतात; पण त्या मोबदल्यात त्यांच्याकडून पैसेही घेत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या कामासाठी दलालांना काही डॉक्टरांची साथ मिळत आहे. यातील काही दलाल हे वॉर्डबॉयच्या वेशात फिरत असल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक दलालांना येथील कर्मचारी समजतात. त्यामुळे अशा दलालांवर विश्वास ठेवून रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्यांच्याकडून वैद्यकीय तपासणीचे काम करून घेतात. हा प्रकार उघडपणे सुरू असूनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन मात्र त्याकडे डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाºया रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे.
हा प्रकार चुकीचा असून, रुग्णांनी उपचारासाठी कोणालाच पैसे देऊ नये, रुग्णांच्या सोयीसाठी मार्गदर्शक फलक लावण्यास प्राधान्य देऊ. शिवाय, रुग्णांच्या मदतीसाठी लवकरच मदत केंद्र सुरू करू.
- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.