बहिणीला भावाने केला रक्तदानाचा अहेर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 03:53 PM2019-06-02T15:53:16+5:302019-06-02T15:53:22+5:30
बहिणीच्या लग्नामध्ये तिला अहेर म्हणून भावाने चक्क रक्तदानाचा अहेर करीत सामाजिक संदेश दिला.
- विजय शिंदे
अकोट: रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच श्रेष्ठदान, अशी महती असलेल्या रक्तदानाचा आगळा-वेगळा कार्यक्रम अकोट येथे पार पडलेल्या साबळे व पाटील कुटुंबाच्या लग्नसमारंभात पार पडला. बहिणीच्या लग्नामध्ये तिला अहेर म्हणून भावाने चक्क रक्तदानाचा अहेर करीत सामाजिक संदेश दिला.
लग्नसमारंभ मोठ्या थाटामाटात पार पाडले जातात. रुसवे, फुगवे, थट्टा मस्करी, पाहुण्यांच्या भेटीगाठी, शुभमंगलम होऊन अक्षता पडतात. स्नेहभोजन झाल्यानंतर लग्न खूपच चांगले झाले, अशी चर्चा करीत वºहाडी व पाहुणे परततात; परंतु तरोडा येथील साबळे कुटुंबीयांनी या लग्नात जुन्या चालीरितींना फाटा देत रक्तदान शिबिरासारखा सामाजिक उपक्रम श्रद्धासागर येथे पार पडलेल्या लग्नात आयोजित केला होता. सध्या रक्त आणि रक्तघटक ही आरोग्य सेवेतील आवश्यक उपचार प्रणाली झाली आहे. आजचा रक्तदाता उद्याचा रक्त घेणारा असू शकतो किंवा आज रक्त घेणारा रुग्ण बरा झाल्यावर भविष्यात रक्तदाता असू शकतो, अशा स्थितीत काहीही अपेक्षा न करता दिलेले रक्तदान हे जीवनदान व खरी मानवसेवा ठरते. त्यामुळे लोकांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती वाढविण्याच्या दृष्टीने व रक्तदान केल्याने गरीब, गरजू रुग्णांचे प्राण वाचवू शकतो, असा संदेश देण्याकरिता नवरीचा भाऊ मुन्ना ऊर्फ किरण साबळे याने आपल्या बहिणीला अहेर म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सेवानिवृत्त विस्तार अधिकारी अजाबराव साबळे यांची पुतणी पायल गोवर्धन साबळे हिचा शुभविवाह शुभम अरविंद पाटील यांच्यासोबत २६ मे रोजी श्रद्धासागर येथे पार पडला. या शुभविवाह सोहळ्यानिमित्त मुलीचा मोठा भाऊ किरण साबळे व त्याच्या मित्र परिवाराने कुठलीही भेटवस्तू न आणता रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराकरिता अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयाच्या रक्तपेढीची निवड केली. तेथील डॉ. शिल्पा तायडे, डॉ. भाग्यश्री घुगे, डॉ. अस्मिता व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन रक्त संकलन केले.