भांबेरी येथे बाप-लेकाची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:17 AM2021-05-30T04:17:14+5:302021-05-30T04:17:14+5:30
अकोला/तेल्हारा : तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांबेरी येथे आपसी वादातून शनिवार २९ मे रोजी अनैतिक संबंधातून एकाच कुटुंबातील चार ...
अकोला/तेल्हारा : तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांबेरी येथे आपसी वादातून शनिवार २९ मे रोजी अनैतिक संबंधातून एकाच कुटुंबातील चार जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये बाप-लेकाचा मृत्यू झाला असून, त्यांच्याच कुटुंबातील माय-लेक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. देवीदास भोजने व अजय भोजने मृतकांची नावे असून, ते बाप-लेक आहेत. तर प्रमिला भाेजने व विजय भाेजने हे माय-लेक गंभीर जखमी आहेत.
प्रमिला देवीदास भोजने (रा. भांबेरी) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती देवीदास भोजने व मुले अजय भोजने, विजय भोजने हे सर्व जण एकत्र राहतात. प्रमिला भाेजने यांचा मुलगा अजय याची पत्नी पूजा हिला आरोपी भीमराव भाेजने याचा मुलगा प्रफुल्ल भोजने याने सहा महिन्यांपूर्वी पळवून नेले हाेते. या कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरू झाले होते. अजय भोजने यांच्या दीड वर्षाच्या मुलीला फिर्यादी म्हणजेच तिची आजी प्रमिला देवीदास भाेजने यांनी हटकले असता घरासमोरून जात असलेल्या आराेपी प्रमिला भीमराव भोजने हिने ते ऐकले. या कारणावरून शाब्दिक वाद झाला. त्यानंतर काही वेळातच आरोपी प्रमिला भीमराव भोजने, राजेश गणपत भोजने, दर्शन भीमराव भोजने, भीमराव गणपत भोजने या चार जणांनी प्रमिला देवीदास भाेजने यांच्या घरी शस्त्रांसह धाव घेतली. त्यानंतर वाद विकाेपाला जाताच फिर्यादी प्रमिला देवीदास भाेजने यांचे पती देवीदास भोजने, दोन मुले अजय भोजने व विजय भोजने यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या देवीदास भाेजने यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा अजय भाेजने हा गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच शनिवारी दुपारी त्यांचाही मृत्यू झाला. तर याच प्राणघातक हल्ल्यात प्रमिला देवीदास भाेजने आणि त्यांचा दुसरा मुलगा विजय देवीदास भाेजने हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तेल्हारा पाेलीस ठाण्यात आराेपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चारही आराेपींना अटक करण्यात आली आहे. त्यांची चाैकशी करण्यात येत आहे.
--------------------
आराेपी फरार, काही तासांत केली अटक
प्रमिला भीमराव भोजने, राजेश गणपत भोजने, दर्शन भीमराव भोजने, भीमराव गणपत भोजने या चारही आराेपींनी हत्याकांड केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, उपविभागीय पाेलीस अधिकारी काळे व तेल्हारा पाेलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आराेपींची नावे निष्पन्न हाेताच त्यांना काही तासांतच अटक केली. या आराेपींना रविवारी न्यायालयासमाेर हजर करण्यात येणार आहे.
-----------------------------
बाखराबाद हत्याकांडाची पुनरावृत्ती
बाखराबाद येथे एकाच वेळी चार जणांची हत्या केल्याची माेठी घटना उरळ पाेलीस ठाण्याच्या हद्दीत घडली हाेती. त्यानंतर शनिवारी भांबेरी येथे घडलेले दुहेरी हत्याकांडही अशाच प्रकारचे असल्याचे समाेर आले आहे. मात्र, सुदैवाने दाेघांचे प्राण वाचले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे बाखराबाद हत्याकांडाची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा पाेलीस खात्यात हाेती.