पूर्व वैमनस्यातून बापलेकाची निर्घृण हत्या; अकोला जिल्ह्यातील घटना, दोेघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 09:04 AM2021-05-30T09:04:58+5:302021-05-30T09:05:10+5:30
प्रमिला भाेजने यांचा मुलगा अजय याची पत्नी पूजा हिला आरोपी भीमराव भाेजने याचा मुलगा प्रफुल्ल भोजने याने सहा महिन्यांपूर्वी पळवून नेले हाेते. या कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वैमनस्य होते.
अकोला : तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांबेरी येथे शनिवारी आपसातील वादातून एकाच कुटुंबातील चार जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये बापलेकाचा मृत्यू झाला असून, पत्नी व दुसरा मुलगा जखमी झाले आहेत.
देवीदास भोजने व अजय भोजने अशी मयत बापलेकांची नावे आहेत, तर प्रमिला भाेजने व विजय भाेजने अशी जखमी मायलेकाची नावे आहेत. मयताची प्रमिला देवीदास भोजने (रा.भांबेरी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
प्रमिला भाेजने यांचा मुलगा अजय याची पत्नी पूजा हिला आरोपी भीमराव भाेजने याचा मुलगा प्रफुल्ल भोजने याने सहा महिन्यांपूर्वी पळवून नेले हाेते. या कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वैमनस्य होते. प्रमिला देवीदास भोजने यांनी आपल्या दीड वर्षाच्या नातीला उद्देशून बोलले असता, घरासमोरून जात असलेल्या आराेपी प्रमिला भीमराव भोजने हिने ते ऐकले. या कारणावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर काही वेळातच आरोपी प्रमिला भीमराव भोजने, राजेश गणपत भोजने, दर्शन भीमराव भोजने, भीमराव गणपत भोजने या चार जणांनी देवीदास भोजने कुटुंबावर शस्त्रांसह हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या देवीदास भाेजने यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा अजय भाेजने हा गंभीर जखमी झाल्याने उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
याच प्राणघातक हल्ल्यात प्रमिला देवीदास भाेजने आणि त्यांचा दुसरा मुलगा विजय देवीदास भाेजने हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तेल्हारा पाेलीस ठाण्यात आराेपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चारही आराेपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत तेल्हारा पोलीस अधिक तपास करीत आहेत. या हत्यांमध्ये अन्य कुणा आरोपींचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात असल्याचे पोलीस अधिका-यांनी सांगितले.