बीएसएफ जवानाला पोलिसांची धक्काबुक्की
By admin | Published: May 4, 2017 01:02 AM2017-05-04T01:02:15+5:302017-05-04T01:02:15+5:30
तक्रार नाही: दुचाकी अडविल्यावरून झाला वाद
अकोला : डाबकी रोड परिसरात राहणारा एक बीएसएफ जवान जम्मू काश्मीरला जाण्यासाठी मित्रांसोबत दुचाकीने जात असताना, श्रीवास्तव चौकात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला अडविले. दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केल्यावर त्यांच्यामध्ये वाद झाला. बीएसएफ जवान व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना बुधवारी रात्रीदरम्यान घडली. याप्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तक्रार करण्यात आली नव्हती.
डाबकी रोड परिसरात राहणारा बीएसएफ जवान जम्मू काश्मीर येथे कार्यरत आहे. जवान सुटीवर घरी आला होता. सुटी संपल्याने बुधवारी रात्री तो रेल्वेगाडीने जम्मू काश्मीरला रवाना होणार होता. मित्रासोबत जवान दुचाकीने रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी निघाला असता, श्रीवास्तव चौकात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याची दुचाकी अडविली आणि दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली. जवानामध्ये आपण बीएसएफमध्ये कार्यरत असून, जम्मूला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे जात असल्याचे पोलिसांना सांगितले; परंतु पोलिसांचे समाधान न झाल्याने त्यांनी कागदपत्रांची मागणी केली. यामुळे बीएसएफ जवान व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. पोलीस कर्मचाऱ्यांनी जवानाला धक्काबुक्की केल्याची माहिती दिली; परंतु त्यांची नावे कळली नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली नव्हती.