बीएसएनएलची सेवा ठप्प; ग्राहक त्रस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:19 AM2021-01-23T04:19:08+5:302021-01-23T04:19:08+5:30
---------------------------- अकोला-नांदेड मार्गाचे काम प्रगतिपथावर पातूर: अकोला-नांदेड या मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे; मात्र नागरिक हैराण झाले आहे. रस्त्याच्या कामासाठी ...
----------------------------
अकोला-नांदेड मार्गाचे काम प्रगतिपथावर
पातूर: अकोला-नांदेड या मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे; मात्र नागरिक हैराण झाले आहे. रस्त्याच्या कामासाठी खोदकाम सुरू असल्याने नागरिकांना ये-जा करताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
---------------------------------
माळेगाव बाजार येथे रामजन्मभूमी गृहसंपर्क अभियान
माळेगाव बाजार: येथे रामजन्मभूमी अयोध्या श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान समितीच्यावतीने गावात शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी सरपंच संजयराव बगाडे, ग्रामपंचायत सदस्य व निधी समर्पण अभियान समितीचे सदस्य उपस्थित होते. (फोटो)
----------------------------------------
तुरीचा उतारा तीन ते चार क्विंटल
आपातापा: परिसरात तुरीची सोंगणी व काढणीला वेग आला आहे. यंदा खरीप हंगामात अतिपावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तुरीच्या पिकावर आशा होती; मात्र तुरीचा उतारा एकरी तीन ते चार क्विंटलच लागत असल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. (फोटो)
-----------------------------------------
यावलखेड-सांगळूद रस्त्याची दुर्दशा
सांगळूद: यावलखेड-सांगळूद रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्याने वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.
--------------------------------
वन्य प्राण्यांचा हैदोस; हरभऱ्याचे नुकसान
बार्शिटाकळी: तालुक्यातील विराहीत शिवारात वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला असून, पिकांचे नुकसान होत आहे. सध्या शेतशिवारात हरभऱ्याचे पीक बहरलेले आहे. रात्रीच्या सुमारास वन्य प्राणी शेतात जाऊन पिकांची नासाडी करीत आहेत.
-----------------------------------
अखेर जऊळका परिसरात वीज पुरवठा सुरळीत
वरुर जऊळका: सावरा फिडरअंतर्गत वरुर जऊळका, लोतखेड, खापरवाडी, विटाळी, सावरगाव आदी गावांमध्ये विजेचा लपंडाव सुरू होता. महावितरणकडून तांत्रिक बिघाड दुरुस्ती केल्याने वीज पुरवठा सुरळीत झाला आहे.
--------------------------------------
अडसूळ- तेल्हारा रस्त्यावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ
मनात्री: अडसूळ-तेल्हारा रस्त्याचे काम सुरू असल्याने या मार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तेल्हारा-अडसूळ मार्गावर मनात्री परिसरात रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
---------------------------------------
कापसाची उलंगवाडी सुरू; उत्पादन घटले!
बाळापूर: तालुक्यात कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात होता. सध्या कापसाची उलंगवाडी सुरू झाली आहे. यंदा कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने एकरी पाच ते सहाच क्विंटलचा उतारा लागला. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम हा तोट्यात गेला आहे.
---------------------------------------
बससेवा पूर्ववत करण्याची मागणी
हातरुण : हातरुण-धामणा बसफेऱ्या बंद असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळेत पायी जावे लागते. त्यामुळे याकडे लक्ष देऊन ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
----------------------------
गावंडगाव येथे घाणीचे साम्राज्य; आरोग्य धोक्यात!
खेट्री : पातूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या गावंडगाव येथे गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यामुळे गावात स्वच्छता अभियान राबविण्याची मागणी होत आहे.