दोन दिवसांपासून ‘बीएसएनएल’ची सेवा ठप्प
By admin | Published: June 29, 2015 02:04 AM2015-06-29T02:04:31+5:302015-06-29T02:04:31+5:30
दोन दिवसांपासून ‘बीएसएनएल’ची सेवा ठप्प
अकोला : फायबर ऑप्टीकल केबलच्या समस्येमुळे शनिवार सकाळपासूनच भारतीय संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) शहरातील सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे शहरातील ऑनलाइन व्यवहार प्रभावित झाले होते. हीच परिस्थिती रविवारीदेखील कायम असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
जुना कापड बाजार येथील भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या मुख्य कार्यालयात फायबर ऑप्टीकल केबलच्या समस्येमुळे शनिवारी सकाळपासून शहरात बीएसएनएलची सेवा खंडित झाली. शनिवारी सकाळी १0 वाजता बीएसएनएलची सेवा अचानक बंद झाल्याने व्यापारी वर्गातील ऑनलाइन व्यवहार प्रभावित झाले. तसेच लॅन्डलाइन सेवादेखील बंद झाल्याने सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. शनिवारी सकाळपासून खंडित झालेली सेवा दुपारच्या दरम्यान काही काळासाठी सुरू झाली होती. परंतु, काही काळातच पुन्हा सेवा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली. इंटरनेट सेवा बंद झाल्याने व्यापारी वर्गासोबतच विद्यार्थी वर्गालादेखील त्रास सहन करावा लागला. महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया तसेच स्पर्धा परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच भरावे लागत असल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत शहरातील काही भागात सेवा सुरळीत झाली असली तरी काही भागात दुसर्या दिवशीदेखील ही परिस्थिती कायम आहे. रविवार असल्याने बीएसएनएल कार्यालय बंद होते. रविवारीदेखील शहराच्या अनेक भागात बीएसएनएलच्या विस्कळीत सेवेमुळे नागरिक त्रस्त आहेत.