ओबीसी आरक्षणासाठी बसपाने दिले धरणे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:22 AM2021-07-14T04:22:06+5:302021-07-14T04:22:06+5:30
अकोला: अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्यात यावे आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत ...
अकोला: अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्यात यावे आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी बहुजन समाज पार्टी (बसपा) अकोला जिल्हा शाखेच्या वतीने मंगळवार, १३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आले.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा शासन निर्णय मागे घेऊन पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्यात यावे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, शेतकऱ्यांच्या शेतमालास हमी भाव देण्यात यावा, पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ कमी करुन महागाई कमी करण्यात यावी, कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे इत्यादी मागण्यांसाठी बसपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यामार्फत राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात बसपाचे जिल्हाध्यक्ष विजय येलकर यांच्यासह डाॅ.एस.एस.तायडे, प्रवीण गोपनारायण, वामन सरकटे, अश्वजीत मानकीकर, बाळासाहेब चक्रनारायण, विरेंद्र सिरसाट, धनराज सिरसाट, अमोल वानखडे, डाॅ. धनंजय नालट, भाग्यश्री गवई, देवानंद गवई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.
...........................फोटो..................