बीटी बियाण्यातील रेफ्युजी तपासणीची धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 03:16 PM2018-06-19T15:16:02+5:302018-06-19T15:16:02+5:30
शेतकऱ्यांनी बीटी बियाण्यासोबतचे रेफ्युजी बियाणे पेरलेच पाहिजे, यासाठी कंपन्यांनी पुरवठा केलेल्या बियाण्यांचे नमुने तपासणीची धडक मोहीम कृषी विभागाकडून सुरू आहे.
अकोला : गेल्यावर्षी बीटी कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा हल्ला झाल्याने शेतकरी पुरता गारद झाला. चालू हंगामात हा प्रकार रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी बीटी बियाण्यासोबतचे रेफ्युजी बियाणे पेरलेच पाहिजे, यासाठी कंपन्यांनी पुरवठा केलेल्या बियाण्यांचे नमुने तपासणीची धडक मोहीम कृषी विभागाकडून सुरू आहे, असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे यांनी सांगितले.
बीटी कापूस पिकाला गुलाबी बोंडअळीने पोखरले. त्यातून शेतकºयांचे ९० टक्क्यांपेक्षाही अधिक नुकसान झाले. त्याचा फटका बसलेल्या शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या. गुलाबी बोंडअळीने कापूस पीक फस्त केल्याच्या जिल्ह्यातील १९३२४ शेतकºयांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामध्ये २९१०३ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले. त्या तक्रारींची चौकशी तसेच नुकसानाचे सर्वेक्षण करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाºयांनी प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेतली. त्यावेळी गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असलेल्या शेतामध्ये बियाण्याच्या पाकिटासोबत दिल्या जाणाºया रेफ्युजी बियाण्याची पेरणीच शेतकºयांनी केली नसल्याची माहिती पुढे आली. अळ्यांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त ठरणारी नॉन बीटी रेफ्युजी बियाणे इतरत्र फेकण्यात आले. परिणामी, गुलाबी बोंडअळीने थेट कापूस पिकावरच हल्ला केल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. सिंचनाची सोय असलेल्या भागात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात बोंडअळीच्या हल्ल्यात बळी पडले. त्यामुळे चालू वर्षात गुलाबी बोंडअळीचा हल्ला रोखण्यासाठी कृषी विभागाने बियाणे नमुने तपासणीची धडक मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी बियाण्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठीही पाठवण्यात आले. त्याचा अहवाल आल्यानंतर बीटी कापूस बियाण्यांत रेफ्युजीचे प्रमाण ठरल्यापेक्षा कमी असल्यास संबंधित कंपन्यांवर कारवाईची शक्यता आहे. तर त्याचवेळी शेतकºयांना बियाण्यांसोबतच्या रेफ्युजीची पेरणी अनिवार्य करण्यात येणार आहे.
- प्रयोगशाळेत पाठवले बियाणे, खतांचे नमुने
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने बाजारात विक्रीसाठी असलेल्या विविध बियाण्यांचे १९६ नमुने घेतले आहेत. ते सर्व प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यामध्ये बीटी कापूस बियाण्यातील रेफ्युजीची तपासणी करण्यासाठी घेतलेल्या नमुन्यांची संख्या मोठी आहे, असे कृषी विकास अधिकारी ममदे यांनी सांगितले. सोबतच खतांमध्ये असलेल्या घटकांचे प्रमाण तपासणीसाठी बाजारातून ४० नमुने घेण्यात आले. ते सर्व प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्याचाही अहवाल लवकरच प्राप्त होण्याची शक्यता आहे.