महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेचा मुहूर्त निघाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 01:06 PM2019-02-19T13:06:06+5:302019-02-19T13:06:10+5:30
अकोला: शहर विकासाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेला महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या २६ फेब्रुवारी रोजी सभेत सादर केला जाणार आहे.
अकोला: शहर विकासाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेला महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या २६ फेब्रुवारी रोजी सभेत सादर केला जाणार आहे. सकाळी ११ वाजता मनपाच्या मुख्य सभागृहात विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सत्ताधारी भाजप व प्रशासन नेमक्या कोणत्या कामांना प्राधान्य देते, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
महापालिका प्रशासनाने उत्पन्नात वाढ करण्यासाठी मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून सुधारित करवाढ केली. यामुळे कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची समस्या निकाली निघण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. याव्यतिरिक्त जमा रकमेतून शासनाची देणी व इतर विकास कामांच्या निधीत आर्थिक हिस्सा जमा करण्याचे प्रयोजन आहे. ‘अमृत’ योजनेंतर्गत शहरात भूमिगत गटार योजना व पाणीपुरवठा योजनेची कामे निकाली काढल्या जात असून, त्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. एकूणच, मनपाला प्राप्त उत्पन्न व जमा-खर्चाचा ताळमेळ घालून शहरातील विकासाची कामे निकाली काढण्याचा आयुक्त संजय कापडणीस यांचा प्रयत्न राहील. त्यानुषंगाने प्रशासनाने २०१९-२० वर्षासाठी अर्थसंकल्प तयार केला असून, तो येत्या २६ फेब्रुवारी रोजी सभागृहात सादर केला जाणार आहे.
शुक्रवारी स्थगित सभेचे आयोजन
महापालिकेच्या मुख्य सभागृहात २२ जानेवारी रोजी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेत ऐनवेळेवर महापौर विजय अग्रवाल यांना प्रकृती बिघडल्यामुळे सदर सभा स्थगित करण्यात आली होती. या स्थगित सभेचे आयोजन २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मुख्य सभागृहात करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.