अकोल्यात शिकस्त इमारत कोसळली; जीवितहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 12:07 PM2019-08-04T12:07:04+5:302019-08-04T12:07:14+5:30
अकोला: जुने शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात असलेल्या रिकाम्या शिकस्त तीन मजली इमारतीचा काही भाग शनिवारी अचानक कोसळला.
अकोला: जुने शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात असलेल्या रिकाम्या शिकस्त तीन मजली इमारतीचा काही भाग शनिवारी अचानक कोसळला. सुदैवाने या घटनेमुळे जीवितहानी झाली नाही. इमारत शिकस्त झाल्यामुळे महापालिकेने घरमालकाला नोटीस बजावली होती; परंतु घरमालकाने त्याकडे दुर्लक्ष केले. इमारतीचा काही भाग कोसळल्यामुळे महापालिका प्रशासनाने शनिवारी ही इमारत भुईसपाट करण्यास सुरुवात केली.
जुने शहरातील विठ्ठल मंदिराजवळ एक तीन मजली जुनी इमारत असून, ही इमारत शिकस्त झाली होती. ही इमारत केव्हाही कोसळू शकते, त्यामुळे महापालिका प्रशासनाने घरमालकाला नोटीस बजावून ही इमारत पाडण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही घरमालकाने त्याकडे दुर्लक्ष केले. शनिवारी दुपारी मुसळधार पाऊस बरसल्यामुळे या शिकस्त इमारतीचा काही भाग अचानक रस्त्यावर कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर महापौर विजय अग्रवाल, मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह जुने शहर पोलीस, अग्निशमन दल, मनपा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. ही इमारत प्रमुख रस्त्यावर असल्यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तीन मजली इमारतीमधील विद्युत प्रवाह खंडित करून मनपा बांधकाम विभागाने जेसीबीच्या मदतीने ही इमारत जमीनदोस्त करण्याचे काम सुरू केले. इमारत पाडण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)