बुलडाण्यातील चित्रकार संगीताची भरारी
By admin | Published: December 5, 2014 12:07 AM2014-12-05T00:07:13+5:302014-12-05T00:07:13+5:30
तैलचित्रांना मिळतेय साता समुद्रापार पसंती
हर्षनंदन वाघ/ बुलडाणा
रंगरेषांच्या प्रांतात रमणार्या बुलडाण्यातील एका कन्येने आंतरराष्ट्रीयस्तरावर भरारी घेतली आहे. तिने काढलेल्या तैलचित्रांना भरभरून पसंती मिळत आहे. या तैलचित्रांची प्रदर्शन आता मुंबईतील सुप्रसिद्ध जहाँगिर आर्ट गॅलरीमध्येही आयोजित करण्यात आले आहे.
३ वर्षापूर्वी बंगलोर येथे सर्वप्रथम तिच्या तैलचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्या वेळी अमेरिका, इंग्लंड, जपान येथील काही रसिकांनी तिची तैलचित्रे विकत घेतली. त्यातून तिला तब्बल चार लाखापर्यंत मानधन मिळाले होते. आता पुन्हा जहांगीर आर्ट गॅलरी येथे तिने साकारलेल्या भगवान गौतम बुद्ध यांच्या विविध तैलचित्रांचे प्रदर्शन १0 ते १६ डिसेंबर २0१४ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या वेळी देश, तसेच परदेशातील हौशी कलावंत भेट देणार आहेत.
रंग विक्रीचा व्यवसाय करणारे बुलडाण्यातील श्रीकांत व अशाताई कोडोलकर यांची कन्या संगीता कोडोलकर हिला लहानपणापासून रंग, कुंचल्याचे आकर्षण होते. एडेड हायस्कुलची विद्यार्थीनी असलेल्या संगीताने कलेच्या क्षेत्रात करियर करण्यासाठी औरंगाबाद येथे शासकीय बीएफए महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिचे पती अभय राजनकर हे बंगलोर येथे जाहिरात व्यवसायाशी निगडीत असल्यामुळे, तसेच सासरे रत्नाकर आणि सासू सरला राजनकर यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे तिच्या कलेला प्रोत्साहन मिळाले.
*चित्रपट दिग्दर्शक गुलजार भेट देणार
जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित संगीता हिच्या दुसर्या तैलचित्र प्रदर्शनाला देशातील हौशी कलावंतासह प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक गुलजारही भेट देणार आहेत.